‘डुडल’च्या अंतिम फेरीत पुण्याचे तीन विद्यार्थी

Doodle-Drawing
Doodle-Drawing

पुणे - आपण काढलेले चित्र ‘गुगल’वर ‘डुडल’ म्हणून वापरले जावे, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, प्रत्येकाला ती संधी मिळतेच असे नाही. मात्र, या बाबतीत पुण्यातील तीन शालेय विद्यार्थी लकी ठरण्याची चिन्हे आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या ‘डुडल फॉर गुगल’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय पातळीवर ‘डुडल फॉर गुगल’ ही चित्र स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी आणि नववी ते दहावी, असे पाच गट केले आहेत. या प्रत्येक गटात चार अशा एकूण वीस विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या वीस विद्यार्थ्यांमध्ये पुण्यातील डॉल्फिन्स इंटरनॅशनल स्कूलची आरोही दीक्षित (गट- तिसरी ते चौथी), न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमधील यश शेलार (गट- पाचवी ते सहावी) आणि गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयातील बी श्रेया (इयत्ता सातवी ते आठवी) यांचा समावेश आहे.
‘डुडलस्‌’च्या संकेतस्थळावर या वीस विद्यार्थ्यांना मते देण्याचा पर्याय खुला आहे. यातून राष्ट्रीय विजेता ठरविण्यात येणार असून, विजेत्या विद्यार्थ्यांचे चित्र ‘गुगल डुडल’ म्हणून वापरले जाणार आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्याला पाच लाख रुपयांची महाविद्यालयीन शिष्यवृत्ती, तसेच विजेत्या विद्यार्थ्यांच्या शाळेला दोन लाख रुपयांचे तंत्रज्ञान पॅकेज दिले जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्याला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रकही देण्यात येईल. त्याचबरोबर गुगल इंडियाच्या कार्यालयाला भेट देण्याची संधीही विजेत्या विद्यार्थ्याला मिळणार आहे.

या स्पर्धेत ‘गुगल’ हे इंग्रजी आद्याक्षर वापरून विविध संकल्पनांवर आधारित चित्र काढण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर होते. त्यात आरोही हिने ‘शेतकरी’, यशने ‘अंतराळातील अंतहीन शक्‍यता’ आणि श्रेयाने ‘डुडलिंग’ या संकल्पनेवर चित्र रेखाटली आहेत. चित्राबरोबरच आपल्या संकल्पनेचे थोडक्‍यात वर्णनही या विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर नोंदविले आहे. यात ‘शेतकऱ्यांकडून खूप प्रेरणा मिळते. आपल्याला अन्न मिळावे, म्हणून ते अपार कष्ट करतात,’ असा उल्लेख आरोहीने केला आहे. तर, ‘एलियनबद्दल प्रचंड कुतूहल आहे. परग्रहावर जीवसृष्टी आहे का, आणि असेल तर त्या ग्रहावर जाण्याची इच्छा आहे,’ अशी अपेक्षा यशने व्यक्त केली आहे. तर, बी श्रेयाने ‘डुडलिंग’ या संकल्पनेविषयी लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com