शिरोली येथे झालेल्या दोन युवकांच्या खुनांचे गूढ उकलले

crime.jpg
crime.jpg

राजगुरूनगर :  शिरोली (ता. खेड) येथील  हरणटेकडीच्या रानात झालेल्या दोन युवकांच्या खुनाच्या गुन्हाची उकल झाली आहे. खेड पोलिसांनी एका संशयिताच्या इन्स्टाग्रामवरील सांकेतिक संदेशाच्या साहय्याने कयास बांधून १२ तासात गूढ उलगडले आणि तीन संशयितांना अटक केली. मात्र अंदाजे सहा आरोपी अद्याप फरार आहेत.

बबलू उर्फ अभिषेक उत्तम भालेराव (वय १९, रा. शिरोली ता. खेड), ऋषिकेश राजेंद्र वाडेकर (वय २२, रा. शिरोली, ता. खेड) आणि निखिल अशोक शिंदे (वय २०,  रा. शिरोली, ता. खेड ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी या गुन्ह्याच्या घटनाक्रमाची माहिती दिली. शिरोलीच्या खापरदरा येथील हरणटेकडीवर दोन जणांचे मृतदेह पडलेले असल्याची माहिती खेड पोलिसांना शनिवारी बाराच्या सुमारास समजली.  त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर, डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. त्यांची नावे निरंजन अशोक गुरव (वय २०, रा. पिंपळे गुरव) आणि बजरंग दयानंदराव जाधव (वय २२, रा. पिंपळे गुरव) असल्याचे नंतर निष्पन्न झाले. आरोपींनी गुन्हा करताना पुरावे नष्ट केलेले असल्यामुळे त्याचा तपास करणे क्लिष्ट होते. 

मृत दोघेजण आणि त्यांचा एक साथीदार हे पिंपळे गुरव येथून शिरोली येथे दोन दिवसापूर्वी आले होते. ते संशयित आरोपी शिंदे याच्या नवीन खोलीत राहत होते. शिरोली येथील संशयित आरोपी भालेराव याचा नातेवाईक असलेल्या एका तरुणाचा दोन महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड भागात खून झालेला होता. त्यातील आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. मात्र त्याच्या भावाचा मृत दोघांवरही वहीम होता. म्हणून त्यांना या दोघांचा सूड घ्यायचा होता. भालेराव यांनी हे दोघेजण शिरोली येथे आल्याचे त्याला कळविले.

शुक्रवारी दुपारी अटक केलेले तिघे संशयित आणि पिंपळे गुरव येथील अंदाजे सहा जणांनी, हरण टेकडीवर मृतांना गांजा व दारू पाजली आणि बेधुंद केले. त्यानंतर त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून केला. पुरावा नसल्याने खुनाचा तपास करणे आव्हान होते. संशयितांचे फोन कॉल, लोकेशन, सोशल मिडिया इत्यादी सर्व शोध घेऊन झाला. परंतु धागा मिळत नव्हता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, मृतांना आश्रय देणाऱ्या संशयित शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवले होते. पोलीस अधिकाऱ्यांना, इंस्टाग्राम अकाउंट तपासताना, संशयित शिंदे याच्या अकाउंट वर 'बी डब्ल्यू 302' असा सांकेतिक मजकूर असल्याचे आढळले. यावरून त्यांनी शिंदे, भालेराव आणि वाडेकर यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मात्र यातील अंदाजे सहा जण अद्यापही फरार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com