अशी झाली काश्मिरमध्ये अडकलेल्या पुण्यातील तरुणांची सुटका

pune.jpg
pune.jpg

पुणे (वडगाव शेरी) : सलग तीन दिवस सुरू असलेली बर्फवृष्टी, त्यामुळे गाडले गेलेले रस्ते, खांब कोसळ्याने खंडीत झालेला वीजपुरवठा, रस्त्यावर पडलेली झाडे अन् त्यामुळे बंद झालेली वाहतुक व्यवस्था....अशा वातावरणात तीन दिवस पुण्यातील पाच तरूण जम्मू काश्मिरमध्ये अडकून पडले होते. शेवटी या तरूणांनी भर रात्री बर्फाने झाकलेल्या रस्त्यांवरून नऊ किलोमीटर पायपीट करून स्वतःची सुखरूप सुटका करून घेतली व जम्मू गाठले. हा रोमांचकारी अन् तितकाच थरारक अनुभव या तरूणांनी 'सकाळ'ला सांगितला.      

पुण्यातील वडगाव शेरी, खऱाडी, संगमवाडी आणि विश्रांतवाडी भागातील आबा बालगुडे, मोना परदेशी, पप्पु गरुड, गौरव शर्मा, महेश म्हस्के, नितीन भुजबळ हे तरूण फिरण्यासाठी जम्मू कश्मिरला गेले होते. जम्मूजवळील पटणी टॉप या पर्यटन स्थळावरील उंच डोंगरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. परंतु तेथे पोहोचल्यानंतर (ता. 6) घडले निराळेच.  

याविषयी माहिती देताना पप्पू गरूड म्हणाले, ''बुधवारी रात्री पटनी टॉपला मोठी बर्फवृष्टी सुरू झाली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षातील ही सर्वात मोठी बर्फवृष्टी होती. ही बर्फवृष्टी सलग तीन दिवस सुरू राहिली. हॉटेल बाहेर सर्वत्र तीन फुट बर्फाचा थर जमा झाला. रस्ते गाडले गेले. पटनी टॉपचा इतर ठिकाणशी संपर्क तुटला.  मुख्य रस्त्यावरील झाडे पडली. वीजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे वीज गेली. हॉटेलमधील तापमान कायम ठेवणारी वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. तीन दिवस वीज नसल्याने सर्व व्यवहार जनरेटरवर चालले होते. त्यानंतर जनरेटरचेही डिझेल संपले. त्यामुळे हॉटेलमध्ये थांबणे अवघड झाले. बाहेरही जाता येत नव्हते. 

नितीन भुजबळ म्हणाले, ''सुरू असलेली बर्फवृष्टी पाहून नियोजनाच्या एक दिवस आधीच (ता. 8) आम्ही जम्मू गाठण्याचा निर्णय घेतला. जम्मूचा रस्ता बंद होता. वाहतुक सुरळीत करण्यासाठी बर्फाळ रस्ते साफ करणारी यंत्रणा येईल असे वाटत होते. परंतु दोन तीन ठिकाणी झाडे पडल्याने बर्फ काढणारी यंत्रे पोहोचलीच नाहीत. त्यामुळे रस्ते बंद होते. शेवटी शुक्रवारी सांयकाळी पटनी टॉप ते कुर्दपर्यंत चालत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे अंतर डोंगर उतारावरून नऊ किलोमीटर एवढे चालायचे होते. 

 गौरव शर्मा म्हणाले, ''अंधारातून चालताना बर्फावरून पाय घसरत होते. तर कधी कधी बर्फाखालील खडड्यांचा अंदाज येत नव्हता. गडद अंधारातून वाट काढत आम्ही पाच जण रात्री अकरा वाजता कुर्द या ठिकाणी पोहोचले. तेथून पुढे जम्मूला पोहोचण्याची वाहन व्यवस्था झाली. शेवटी रात्री एक वाजता हे सगळेजण जम्मूला पोहोचले. त्यानंतर शनिवारी जम्मूवरून दिल्ली किंवा मुंबईला येणाऱ्या काही विमानांचे उड्डान रदद् झाले होती. त्यातून मार्ग काढून आमच्यापैकी तीन जन रविवारी दुपारी पुण्याला पोहोचले. तर रविवारी सायंकाळपर्यंत दोन जण दिल्लीतच अडकून पडले होते. हा अऩुभव आमच्यासाठी थरारक आणि रोमांचकारी होता. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com