...तर माझं बाळ अन्‌ ती आज जिवंत असती!

Shubhangi
Shubhangi

महापालिकेच्या रुग्णालयातील महिला रुग्णांच्‍या आरोग्याचे वास्तव मन पिळवटून टाकणारे आहे. हे चित्र ‘सकाळ’ने टिपले. त्यातून गर्भवतींची हेळसांड समोर आली. तेच चित्र मांडणारी ही वृत्तमालिका..

पुणे - ‘पैसे असते, तर आधीच चांगल्या दवाखान्यात गेलो असतो.. पैसे नसल्यानेच महापालिकेच्या दवाखान्यात जावे लागले आणि डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीला जीव गमवावा लागला.. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे माझे स्वप्नही विरले..’ राजीव गांधी दवाखान्यात उपचारांविना जीव गमवाव्या लागलेल्या गर्भवती शुभांगी जानकर यांचे पती राजाराम व्यथा मांडत होते..

शुभांगी यांना २१ मार्च रोजी येरवड्यातील गांधी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. वैभव बगाडे यांनी तपासणी केली. ‘बाळंतपणाला आणखी आठ दिवस लागतील’ असे सांगून शुभांगी यांना घरी पाठविण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्रास सुरू झाल्याने त्यांना सायंकाळी त्याच रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी एकही डॉक्‍टर हजर नव्हता. शुभांगी याच अवस्थेत तासभर ताटकळत होत्या. डॉक्‍टर येणार नसल्याचा निरोप राजाराम यांना रात्री आठच्या सुमारास मिळाला. त्यानंतर शुभांगी यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले, तोपर्यंत उशीर झाला होता. ‘लवकर दाखल केले असते, तर आई आणि बाळाला वाचवता आले असते,’ असे ससूनमधील डॉक्‍टरांनी सांगितले.

ही घटना एकमात्र नाही..! असेच दोन प्रसंग पुण्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये घडले आहेत.

प्रसंग पहिला - याच गांधी रुग्णालयात एका गर्भवतीला तर पाय ठेवताच ससूनमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. ‘किमान तपासणी तरी करा’ या तिच्या वडिलांच्या विनवणीवर ‘इथे तपासण्यांची यंत्रणा नाही’ असे उत्तर मिळाले. याच वेळी दुसरीही एक गर्भवती तिथे आली होती. तिला कळा असह्य झाल्याचे दिसत होते. पण, या रुग्णालयाच्या निर्ढावलेल्या यंत्रणेने साधी विचारपूसही केली नाही. रुग्णालयात एकही डॉक्‍टर आणि परिचारिका जागेवर नव्हती. उपस्थित असलेला शिकाऊ डॉक्‍टरही मोबाईलमध्येच गर्क होता..

प्रसंग दुसरा - रोजंदारीवर घर चालविणाऱ्या कुटुंबात बाळंतपणाचा खर्च परवडणारा नसल्याने कमला नेहरू रुग्णालयात नोंदणी केली. सविता यांना डॉक्‍टरांनी रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. ‘आमच्याकडे डॉक्‍टर नाहीत. तुमचे बाळंतपण कसे होईल, सांगता येत नाही.. आमच्याकडे सिझेरियनची सोय नाही’, असे सांगत त्यांनी तिला दुसऱ्या दवाखान्यात पाठवले. ‘बघा.. उगाच ‘रिस्क’ नको.. तुमचे बाळंतपण चांगले व्हायचे असेल, तर दुसरीकडे जावे लागेल,’ असा सल्ला तिथलीच परिचारिका देत होती. नऊ महिने पाच दिवस झालेल्या सविता रुग्णालयातून बाहेर पडली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ‘आपण आई होणार’ यापेक्षाही बाळंतपणाच्या खर्चाची चिंता अधिक होती... (क्रमशः)

आवाहन
महापालिका रुग्णालयांचा असा अनुभव तुम्हाला आला आहे का? त्यावर प्रॅक्‍टिकल उपाय काय करता येतील, हे तुम्हाला सुचत आहे का? 

आपल्या सूचना फेसबुक आणि ट्विटरवर मांडा 
#pmchealth हॅशटॅगवर
ई- मेल करा webeditor@esakal.com वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com