व्याघ्रसंवर्धनासाठी सांघिक प्रयत्नांची गरज - नल्ला मुथ्थू

Nalla-Mutthu
Nalla-Mutthu

पुणे - ‘वाघिणींच्या तुलनेत नर वाघांचे प्रमाण वाढल्याने व्याघ्रसंवर्धनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असले, तरीही त्यात सुधारणा करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे,’’ अशी अपेक्षा वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुथ्थू यांनी व्यक्त केली. 

नल्ला मुथ्थू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘क्‍लॅश ऑफ टायगर्स’ या त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या निमित्ताने बुधवारी ते पुण्यात आले आहेत, त्या वेळी त्यांनी ‘सकाळ’च्या फेसबुक पेजवरून नागरिकांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘वाघांची संख्या समतोल राहण्यासाठी एका वाघामागे तीन वाघिणी असे प्रमाण असणे आवश्‍यक असते; पण आपल्या देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये यात तफावत आढळत आहे. त्याला एकच विशिष्ट असे कारण नसून, अनेक कारणांचा तो एक परिणाम आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात माया ही एक वाघीण असून तेथे तीन ते चार वाघ आहेत.’’

‘प्रत्येक वाघ आपल्यासाठी एक गोष्ट असते,’ असे सांगत नल्ला म्हणाले, ‘‘जुन्या पद्धतीने चित्रीकरण करताना मर्यादा होत्या, त्यामुळे पूर्वी फक्त प्राण्यांच्या वर्तणुकीवरच चित्रपट चित्रित करावा लागत असे; पण डिजिटल क्रांतीने या मर्यादा कमी झाल्या आहेत. हे साधन आता प्रत्येकाजवळ आहे. त्यामुळे आता एखाद्या वाघाच्या वर्तणुकीवर चित्रपट पाहण्याकडे लोकांचा कल नसतो, तर गोष्टीरूपातून चित्रपटाच्या पडद्यावर दाखविलेला वाघ त्यांना आवडतो. माणसाप्रमाणेच त्याचे भावविश्‍व पडद्यावर उलगडलेले पाहायला लोक पसंती देतात.’’

माणूस आणि वाघ यांच्यातील संघर्ष हे एक भविष्यातील आव्हान आहे, याबद्दल विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘आपल्या हद्दीत आलेल्या बहीण-भावाला किंवा सख्ख्या आईलाही वाघ सहन करत नाही. अशा वेळी माणसाला तो सहन करेल, अशी अपेक्षा कशी ठेवायची? त्यामुळे हा प्रश्‍न सोडविताना त्यावर शाश्‍वत मार्ग स्वीकारला पाहिजे, त्यासाठी एकेकट्याने प्रयत्न करून यश येण्याची शक्‍यता कमी असल्याने सर्वांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले पाहिजे.’

लवकरच ‘माया’ पडद्यावर
राज्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया ही वाघीण सर्व पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असते. राजस्थानच्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील मछली या वाघिणीपाठोपाठ महाराष्ट्रातील मायावर नल्ला मुथ्थू चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांनी ६० ते ६५ दिवसांचे चित्रीकरण केले आहे. त्यातून मायाच्या नव-नवीन गोष्टी पुढे येत आहेत. लवकरच हा चित्रपट वन्यप्राणीप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com