टिळक संग्रहालयात रोमांचक अनुभूती (व्हिडिओ)

नीला शर्मा
सोमवार, 27 मे 2019

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या अभ्यासिकेत बसले आहेत. आपण त्यांना पाहतो आहोत. ते जणू काही वळून आपल्याशी बोलणारच आहेत, अशी रोमांचक अनुभूती आपल्याला त्यांच्या संग्रहालयात आल्यास नवल नाही.

पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या अभ्यासिकेत बसले आहेत. आपण त्यांना पाहतो आहोत. ते जणू काही वळून आपल्याशी बोलणारच आहेत, अशी रोमांचक अनुभूती आपल्याला त्यांच्या संग्रहालयात आल्यास नवल नाही.

नारायण पेठेतील केसरीवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत लोकमान्य टिळक संग्रहालय आहे. यात लोकमान्य टिळक यांच्या जीवनाचा पट छायाचित्रे, हस्तलिखिते व प्रतिकृतींमधून उलगडतो. लोकमान्यांच्या अभ्यासिकेच्या प्रतिकृतीत ते लिहीत बसलेले दिसतात. त्यांच्या वापरातल्या खऱ्याखुऱ्या वस्तू या ठिकाणी आहेत. त्यांचं टेबल, त्याला असलेले किती तरी कप्पे, टी पॉयवर ठेवलेलं तांब्याचे भांडे, त्यांचा पलंग, खिडकीची रंगीत काचा असलेली नक्षीदार दारं, भिंतीवरचं घड्याळ, कोनाड्यातलं घड्याळ वगैरे वस्तूंवरून आपली नजर भिरभिरत राहते. 

या संग्रहालयाचं कामकाज बघणारे अमोल पवार म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना इंग्रजांनी मंडाले येथील कारागृहातील कोठडीत ठेवलं होतं. तिथं त्यांनी विविध प्रकारच्या पुस्तकांचा सखोल अभ्यास केला. ‘गीतारहस्य’ हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ इथंच लिहिला गेला. या कोठडीची या संग्रहालयातील प्रतिकृती पाहून अनेक जण भारावून जातात.’’

टिळकांनी सुरू केलेल्या शिक्षणकार्याची व सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याबाबतची माहिती इथं छायाचित्रं व कागदपत्रांमधून पाहताना नवल वाटतं. एकाच माणसानं लेखन, संशोधन, अध्यापन, संपादन, स्वातंत्र्यलढ्यात भरीव योगदान यांसारख्या किती गोष्टी कशा केल्या असतील, असा विचार मनात येतो आणि आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजासाठी काही चांगलं काम करायलाच हवं आहे, अशी स्फूर्ती घेऊनच आपण तेथून बाहेर पडतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tilak Musium Kesariwada Pune