टिंबर मार्केटला रिंगरोडजवळ जागा

सकाळ कार्यालय (बुधवार पेठ) - ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत ‘पूना टिंबर मर्चन्टस्‌ अँड सॉ मिल ओनर्स असोसिएशन’चे सदस्य.
सकाळ कार्यालय (बुधवार पेठ) - ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत ‘पूना टिंबर मर्चन्टस्‌ अँड सॉ मिल ओनर्स असोसिएशन’चे सदस्य.

पुणे - टिंबर मार्केटला अपुरी पडणारी जागा, शहरात अवजड वाहनांवर असलेली बंदी आणि वाहतूक कोंडीमुळे या बाजाराच्या विस्तारासाठी रिंगरोडजवळ जागा राखून ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले असल्याची माहिती ‘पूना टिंबर मर्चन्ट्‌स अँड सॉ मिल ओनर्स असोसिएशन’च्या प्रतिनिधींनी दिली. ‘सकाळ’मध्ये आयोजित बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाकूड व्यापारासमोरील समस्याही मांडल्या. 

या वेळी संघटनेचे अध्यक्ष रतन किराड, शंकर पटेल, कल्पेश शहा, विनोद पोरवाल, संजय मोहनकर, हेमंत रायगांधी, तुषार पटेल आणि व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया उपस्थित होते. पायाभूत सुविधांचा अभाव, शेजारील वसाहतीतील लोकांची बाजारात असणारी वाहने, अवैध धंदे अशा समस्यांना व्यापारी तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पालकमंत्र्यांची भेट घेतल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले. यावर रिंगरोडजवळ जागा राखीव ठेवण्याचे आश्‍वासन बापट यांनी दिले. तेथे घाऊक टिंबर मार्केट हलविणार असून, त्यामुळे भवानी पेठेतील वाहतूक कोंडी कमी होईल. जुनी जागा किरकोळ विक्रीसाठी व्यापाऱ्यांना वापरता येईल. 

सरकारने भवानी पेठेमध्ये १९६० मध्ये टिंबर मार्केटची स्थापना केली. येथे १२८ गाळे होते, पण कालांतराने ही जागा कमी पडत गेली. आता या व्यापाऱ्यांना शहराबाहेर जागा हवी आहे. त्याचबरोबर १९८० च्या दशकात झालेल्या निर्णयानुसार सॉ मिलचे परवाने देण्याची प्रक्रिया रद्द केली. त्या वेळी पुण्यातील ६८ पैकी केवळ चारच व्यापाऱ्यांनी परवाने मिळविले होते, तर ६४ जण पात्र असूनही बंदीमुळे त्यांना परवाना मिळाला नाही. या सॉ मिलला परवाने मिळण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. बाजारात येणाऱ्या लाकडापैकी ९९ टक्के लाकूड हे परदेशातून आयात होते. हा माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी लागणारा पास रद्द करण्याची मागणी प्रतिनिधींनी बैठकीत केली.

 टिंबर मार्केटची स्थापना - १९६०
 संघटनेची स्थापना - १९६३
 संघटनेची सदस्य संख्या - २१२
 शहरातील व्यापारी - ४००
 व्यवसायाची वार्षिक उलाढाल - ११०० कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com