ऐकलंत का? बारामतीतील कुटुंबांवर उपासमारीची वेळ 

विजय मोरे 
Monday, 27 April 2020

सोनवाडी सुपे येथील तीन कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

उंडवडी (पुणे) : सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे रायगड जिल्ह्यातून मजुरी करून उपजीविका करण्यासाठी आलेली तीन कुटुंबे कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अडकून पडली आहेत. या कुटुंबांकडील अन्न धान्य व किराणा संपला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

रायगड जिल्ह्यातून तीन- चार महिन्यांपूर्वी तीन कुटुंबे येथे मोलमजुरी करण्यासाठी आली आहेत. या कुटुंबात लहान मुले, स्त्री व पुरुष, असे मिळवून दहा जणांचा समावेश आहे. ओढ्यातील आणि पडीक जमिनीतील काटेरी झाडे तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याचे काम ही लोक करतात. 

ही कुटुंबे जिथे झाडे तोडणे किंवा कोळसा तयार करण्याचे काम करतात, तिथेच तंबू टाकतात. कोळसा शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकून आपले कुटुंब चालवितात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक लॉकडाउन झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने त्यांचा कोळसा घेऊन जाणे बंद केले आहे.

या कुटुंबांचे हातावरील पोट आहे. धान्य आणि किराणा साहित्य आणण्यासाठी पैसेही नाहीत. स्थानिक पातळीवर ओळख नसल्याने कोणी मदत करायलाही तयार नाही. त्यांचा व्यवसाय सध्या ठप्प झाला आहे. त्यामुळे परिणामी या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. 

आम्हाला मागील पंधरवड्यात येथील स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी व बारामती पंचायत समितीच्या उपसभापती शारदा खराडे यांनी अन्न धान्य व किराणा साहित्य थोडाफार दिला होता. आता आमच्याकडील सर्वच संपले आहे. त्यामुळे आम्हाला अन्नधान्य मदतरूपी मिळावे. 
- भाऊ पवार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time of famine on three families in Baramati