‘आयटीआय’ला प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नवे वेळापत्रक

  • राज्यस्तरीय गुणवत्ता यादी - ९ ऑक्‍टोबर
  • नावनोंदणी व संस्था स्तरावर गुणवत्ता यादी - १० ऑक्‍टोबर 
  • निवड यादी व प्रवेश घेणे - ११ ऑक्‍टोबर

पिंपरी - सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. परंतु यावर्षी विविध कारणांसाठी बहुतांशी आयटीआयमधील शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास शुक्रवारपर्यंत (ता. ११) मुदतवाढ देण्यात आली आहे. 

आयटीआयमधील रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास जुलै महिन्यात सुरवात झाली होती. यावर्षी इलेक्‍ट्रॉनिक, वेल्डर, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मोटार मॅकेनिकल या एकेका ट्रेडमधील २५ जागांसाठी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. परंतु प्रवेश क्षमता कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली होती. शीटमेटल, कार्पेंटर, फौंडी, ओएमटी ट्रेडसाठी विद्यार्थ्यांनी नापसंती दर्शविल्याने या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्याबाबत मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे सरकारच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय संस्थांकडून त्यांच्या स्तरावर रिक्‍त जागा भरण्याच्या कार्यवाहीसाठी ११ ऑक्‍टोबरपर्यंत कालावधी देण्यात आला आहे.

नऊ ऑक्‍टोबर रोजी ज्यांनी अर्ज केले आहेत, परंतु प्रवेश घेतला नाही, अशा सर्व उमेदवारांनी संबंधित शासकीय आयटीआयमध्ये नावनोंदणी करणे व नोंदणीकृत उमेदवारांची संस्था स्तरावर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आवश्‍यक आहे. यापूर्वी अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी आहे. दुसऱ्या दिवशी (ता. १०) नोंदणीकृत उमेदवारांना संस्था स्तरावर प्रवेशासाठी जागा (अलोटमेंट) त्याच दिवशी प्रवेशाची कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. ११ ऑक्‍टोबर ही प्रवेशाची अंतिम मुदत असणार आहे.

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी आहे.
- बसवराज विभुते, प्राचार्य, कॅम्प एज्युकेशन सोसायटी इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, निगडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: time increase for ITI Admission education