यंदा सर्वाधिक फ्लेमिंगो 

PNE18O91819.jpg
PNE18O91819.jpg

पुणे ः राज्यात यंदा पाऊस कमी झालेला पाऊस हा आपल्यासाठी, झाडांसाठी आणि प्राण्यांसाठी मोठी नैसर्गिक आपत्ती असली तरीही रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांसाठी मात्र ही इष्टापत्ती ठरली आहे. भिगवण येथे गेल्या पाच वर्षांमधील सर्वाधिक फ्लेमिंगो यंदा दिसत असल्याचे निरीक्षण पक्षीतज्ज्ञांनी नोंदविले आहे. तेथे पाच ते सहा हजार फ्लेमिंगो सध्या आकाशात भरारी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
पाऊस नसल्याने उजनी जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध होते. फ्लेमिंगोसाठी ही पोषक स्थिती असते. त्यामुळे या भागातील फ्लेमिंगोंची संख्या गेल्या दोन दिवसांमध्ये वेगाने वाढली असल्याचे निरीक्षण वनखात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. त्याला पक्षितज्ज्ञ आणि पक्षी निरीक्षकांनीही "सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला. 

दरवर्षी गुजरातमधील कच्छच्या भागात फ्लेमिंगोची संख्या जास्त असते. यंदा तेथे पाऊस चांगला झाला आहे. तेथील जलाशयांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे जलाशयाची पातळी कमी असलेल्या उजनी भागाला या पक्ष्यांनी पसंती दिली आहे. 

भिगवणच्या जलाशयावर परदेशी पक्षी दरवर्षी येतात. साधारणतः डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान हे परदेशी पाहुणे आपल्याला तेथे बघायला मिळतात. तेही अगदी काही मोजक्‍या जागांवर. यंदा मात्र, सप्टेंबरपासूनच हे पाहुणे जलाशयावर दिसत आहेत. युरोप आणि मध्य आशियातून प्रवास करून हे भिगवणच्या मुक्कामावर पोचले आहेत. उजनी धरणामुळे डिकसळ पारेवाडी आणि दळज कुंभारगाव भागातील पणथळ्यांवर फ्लेमिंगो वाढत आहेत. थंडी कमी झाली आणि उन्हाळा वाढू लागला की, ते मायदेशीतील परतीचा प्रवास सुरू करतात. 

"भिगवणच्या परिसरात फ्लेमिंगोची संख्या वाढली आहे. पाऊस कमी झाल्याने येथे पाण्याची पातळी कमी झाली आहे. थंडी, पाण्याची कमी झालेली पातळी आणि मुबलक खाद्य हे फ्लेमिंगोसाठी पोषक वातावरण सध्या तेथे आहे.'' 
- श्रीलक्ष्मी ए. , उपवनसंरक्षक, पुणे विभाग. 

"गेल्या वर्षी भिगवण परिसरात जेमतेम 500 ते 600 फ्लेमिंगो दिसत होते. या वर्षी आतापर्यंत किमान पाच ते सहा हजार फ्लेमिंगो वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.'' 
- संदीप नगरे, पक्षी निरीक्षक 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com