esakal | Pune I अंदाजपत्रकात असताना जलवाहिनी न टाकल्याने नवीन रस्ता खोदण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Road Digging
अंदाजपत्रकात असताना जलवाहिनी न टाकल्याने नवीन रस्ता खोदण्याची वेळ

अंदाजपत्रकात असताना जलवाहिनी न टाकल्याने नवीन रस्ता खोदण्याची वेळ

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी - अंदाजपत्रकात प्रस्तावित असताना रस्ता तयार करताना नवीन पाण्याची पाइपलाइन न टाकण्यात आल्याने खानापूर ग्रामस्थांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. जुन्या पाइपलाइन मधून असलेली नळजोडणी दुरुस्त करण्यासाठी नव्याने करण्यात आलेला रस्ता खोदावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

'हायब्रीड ॲन्युइटी' या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नांदेड फाटा ते पाबे या रस्त्याचे काम मागील सुमारे तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या डोणजे फाटा ते खानापूर या दरम्यान काही पुलांचे व काही ठिकाणी मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मधे येणाऱ्या प्रत्येक गावातील जलवाहिन्या नव्याने टाकण्याची सदर अंदाजपत्रकात तरतूद असताना प्रत्यक्षात मात्र काम अपूर्ण आहे.

खानापूर येथील काही घरांना जुनी जलवाहिनी खराब झाल्याने मागील काही दिवसांपासून पाणी येत नव्हते. याबाबत ग्रामपंचायतीनेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला परंतु काम झाले नाही. शेवटी जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थांना स्वखर्चाने काम करुन घ्यावे लागले व त्यासाठी नाइलाजाने नवीन रस्ता खोदावा लागला.

हेही वाचा: पुण्यात पर्यटनस्थळं, नाट्यगृहं सुरू होणार

'कित्येक वेळा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याची लाईन टाकण्याबाबत विनंती केली आहे. जुनी जलवाहिनी रस्त्याच्या मधोमध असल्याने सध्या दुरुस्ती करताना खुप अवघड जात आहे. लवकरात लवकर नवीन पाइपलाइन टाकण्यात यावी.'

- निलेश जावळकर, माजी सरपंच खानापूर.

'सदर ठिकाणी काही अतिक्रमण असल्याने काम करण्यात अडचणी येत आहेत. संबंधितांना अगोदर नोटीस देण्यात आलेली आहे. लवकरच कायदेशीर मार्गाने अतिक्रमण काढण्यात येईल व रस्त्याच्या कडेने नवीन पाण्याची पाइपलाइन टाकून घेण्यात येईल.'

- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

loading image
go to top