#TodPolicy ‘टीओडी’ झोनच्या अध्यादेशात गोंधळ

#TodPolicy ‘टीओडी’ झोनच्या अध्यादेशात गोंधळ

पुणे - ट्रान्झिट ओरिऐटेड डेव्हलपमेंट (टीओडी) झोनसंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये गोंधळ असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता न घेताच मूळ नियमावलीत महापालिका प्रशासनाने साध्या प्रस्तावानुसार अनेक बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. याचबरोबर या झोनमध्ये हस्तांतरीय विकास हक्क (टीडीआर) वापरता येणार नसल्याचे सांगतानाच दुसरीकडे मात्र तो वापरण्यास अध्यादेशात परवानगी देण्यात आली आहे. 

मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंस दर्शविण्यात आलेल्या ‘टीओडी’ झोनच्या नियमावलीस राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली. महापालिकेच्या विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेला ‘टीओडी’ झोन, त्यासाठी करण्यात आलेली नियमावली आणि प्रत्यक्षात नगर विकास खात्याने मंजुरी दिलेली नियमावली यात अनेक बदल केले आहेत. हे बदल करताना ‘टीओडी’ झोन संदर्भात महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता परस्पर प्रस्ताव दाखल केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विरोधात कोणी न्यायालयात दाद मागितल्यास हा आदेश अडचणीत येण्याची शक्‍यता बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

विकास आराखड्यात मेट्रो मार्गच्या दोन्ही बाजूंस चारपर्यंत चटई क्षेत्र निर्देशांक देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र केवळ स्टेशन परिसरातच तो देण्याचा निर्णय सरकारने घेतला. तसेच या झोनमध्ये टीडीआर वापरता येणार नाही, अशी तरतूद केली आहे. प्रीमिअम शुल्क आकारून वापरण्यात येणाऱ्या ‘एफएसआय’च्या २५ टक्के ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी देण्याचे नमूद केले आहे.

एकाच अध्यादेशामध्ये या दोन्ही तरतुदी असल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

जागेचे क्षेत्रफळ आणि रस्तारुंदीनुसार प्रीमिअम ‘एफएसआय’ वापरण्यासंदर्भात विकास आराखड्यातील बांधकाम नियमावलीमध्ये तक्ते दर्शविण्यात आले आहेत. त्यामध्ये परस्पर बदल करीत राज्य सरकारने ‘एफएसआय’ वाढविला आहे. त्यामुळे ‘टीओडी’ झोनसंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये अनेक परस्परविरोधी बाबी असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

‘टीओडी’ झोनसंदर्भात प्रारूप नियमावलीत ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे मेट्रोच्या मार्गावर रस्तारुंदी आणि ॲमेनिटी स्पेसचा ‘टीडीआर’ करण्यात अडचण निर्माण होणार होती. या आदेशाने सरकारने ही अडचण दूर केली आहे. ‘टीडीआर’ निर्माण करणे आणि तो वापरणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे.
- राजेश चौधरी, सदस्य, प्रदेश क्रेडाई

विकास आराखड्यातील नियमावलीनुसार ‘टीओडी’ झोनमध्ये ‘टीडीआर’ वापरता येणार नाही. अध्यादेशातही तसेच नमूद केले आहे. त्याच आदेशात २५ टक्के ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी दिली आहे. हा गोंधळ लक्षात घेता महापालिका कठोर धोरण राबविणार का?
- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क समिती

आदेश अस्पष्ट
‘टीओडी’ झोन संदर्भात नियमावलीस राज्य सरकारने ८ मार्चला मान्यता दिली. परंतु त्यापूर्वी या झोनमध्ये ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी नसतानाही काही ठिकाणी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहेत. अशा बांधकामांबाबत काय निर्णय घ्यावयाचा, याबाबत नगर विकास खात्याच्या आदेशात स्पष्टता नाही. त्यामुळे अशा बांधकामांचे आणि नियमबाह्य ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचे काय, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com