शुल्कवाढीविरोधात आज "चक्का जाम' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - केंद्र सरकारने परिवहन शुल्कात केलेल्या वाढीच्या विरोधात आज (मंगळवारी) चक्का जाम आंदोलन आणि शहरात रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. 

पुणे - केंद्र सरकारने परिवहन शुल्कात केलेल्या वाढीच्या विरोधात आज (मंगळवारी) चक्का जाम आंदोलन आणि शहरात रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. 

केंद्र सरकारच्या आदेशानुसार परिवहन विभागाने दुपटीपासून दहापटीपर्यंत केलेल्या शुल्कवाढीविरोधात बहुतांश रिक्षा संघटनांनी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, प्रवासी व मालवाहतूकदार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे टॅक्‍सी, स्कूल व्हॅन, ट्रक, टेम्पो, खासगी बस आदी वाहनेही बंद राहणार आहेत. या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी कळविले आहे. दरम्यान, रिक्षाचालकांच्या संपामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. 

परिवहन विभागाने 29 डिसेंबरपासून नवीन वाहन (दुचाकी) नोंदणीसाठी साठ रुपयांऐवजी तीनशे रुपये, खासगी चारचाकी वाहनासाठी दोनशे रुपयांवरून सहाशे रुपये, मध्यम प्रवासी वाहनासाठी चारशे रुपयांवरून एक हजार रुपये शुल्क केले आहे. दुचाकीवर कर्ज बोजा चढविण्यासाठी शंभर रुपयांवरून पाचशे रुपये, रिक्षावर कर्ज बोजा चढविण्यासाठी शंभर रुपयांवरून दीड हजार रुपये आणि मध्यम व जड वाहनांवर कर्ज बोजा चढविण्यासाठी शंभर रुपयांवरून तीन हजार रुपये इतके शुल्क वाढविण्यात आले आहे. त्याचा वाहतूकदार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे 

खासगी वाहनांना परवानगी 
वाहतूकदार संघटनेच्या चक्का जाम आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी कार आणि सर्व प्रकाराच्या वाहनांतून दूध, फळे, भाजीपाला यासारख्या अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी चक्का जाम आंदोलन संपल्यानंतर संपुष्टात येणार आहे, असे आदेश राज्य सरकारकडून आज देण्यात आले.

Web Title: Today, against the hike