‘राष्ट्रवादी’ची आज जाहीर सभा; भाजपची सिंहगडावर शपथ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ता मिळवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा नारळ सोमवारी (ता. ६) फुटणार आहे. सारसबाग परिसरात राष्ट्रवादीची सभा, तर सिंहगडावर भाजपच्या उमेदवारांना शपथ देण्यात येणार आहे.  

पुणे - महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ता मिळवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा नारळ सोमवारी (ता. ६) फुटणार आहे. सारसबाग परिसरात राष्ट्रवादीची सभा, तर सिंहगडावर भाजपच्या उमेदवारांना शपथ देण्यात येणार आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठीचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या जाहीर सभेने होणार आहे. सारसबाग परिसरात सोमवारी (ता. ६) सायंकाळी सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, आमदार आदी उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससमवेत आघाडी केली असून, १३२ उमेदवार जाहीर केले आहेत. 
सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप महापालिकेच्या माध्यमातून सुराज्याची मुहूर्तमेढ रोवणार असल्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख, सुशासनासाठी कटिबद्ध होण्याची शपथ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजप उमेदवारांना देणार आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजता सिंहगडावर हा कार्यक्रम होणार आहे. 

यानिमित्त सिंहगडावरील कोंढाणेश्‍वर व अमृतेश्‍वर मंदिरात सकाळी सात वाजता महाअभिषेक करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि राजाराम महाराजांच्या समाधीचे पूजन करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांसह पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि सर्व उमेदवारांना या प्रसंगी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Today NCP public meetings