
मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीच्या लेकीने रंगवल्या भिंती
कठीण परिस्थितीतही ताठ मानेने वाट काढत पुरुषांच्या बरोबरीने रंगकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून मुलींच्या शिक्षणासाठी जेजुरीतील शहाजहान नजीर सय्यद झटल्या. त्या सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत खऱ्याअर्थाने तेवत ठेवली आहे, म्हणले तर वावगे ठरणार नाही. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीच्या लेकीचा प्रवास...
-तानाजी झगडे, जेजुरी
सन १९७२मध्ये शहाजहान यांचे लग्न झाले. सासरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. जेजुरीत भाड्याची खोली घेऊन तेथे सय्यद कुटुंब वास्तव्यास होते. येथे शहाजहान यांचे पती नजीर यांनी स्वतःचे रंगकाम घेण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात शमा, हसीना यांचा जन्म झाला. मुलगा होईल या जुन्या रूढी परंपरेत गुरफटलेले असल्यामुळे मुलाची वाट पाहता पाहता त्यांना पुढे शाकिरा व नाझनीन या अजून दोन मुली झाल्या. याकाळात पतीबरोबर शहाजहान या रंगकाम करण्यास जाऊ लागल्या.
संसाराचा गाडा पुढे ढकलत असताना मुलींचे शिक्षण व त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी परिस्थितीसमोर हात न टेकता शहाजहान यांनी चौघी मुलींचे संगोपन व कुटुंबांचा भार सांभाळत स्वतः रंगाची कामे घ्यायला सुरुवात केली. प्रामाणिकपणा, कष्टाळूवृत्ती यामुळे त्या प्रत्येक घरात रंगवाल्या भाभी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सन १९९० मध्ये त्यांच्या मोठ्या मुलीचे काविळीने निधन झाले. याकाळात उर्वरित तीन मुलींना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेत मुलींना पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण दिले. शहाजहान यांच्या कन्या शाकिरा असीम जमादार मंत्रालयात नोकरीला आहे. हसीना शेख बारामती येथे नामांकित पतसंस्थेत आहे. तर नाझनीन काजी ही पुण्यात पीएमपीएमएलमध्ये वाहक या पदावर कार्यरत आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..