उसाचे एका एकरात ११० टन उत्पादन

उसाचे एका एकरात ११० टन उत्पादन

सोमेश्वरनगर, ता. ५ : पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालत मगरवाडी (ता. बारामती) येथील प्रगतशील शेतकरी तानाजीराव गोविंदराव सोरटे यांनी २१ एकरात उसाचे तब्बल २३२७ टन उत्पादन मिळविले आहे. तब्बल २१ एकर क्षेत्र असतानाही त्यांनी एकरी ११० टनांच्या उत्पादकांची सरासरी गाठण्याची किमया साधली आहे. योग्य जोपासना केल्यामुळे ऊस सत्तर कांड्यावर जाऊन पोचला आहे.

सोमेश्वर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे यांचे वडील व नामवंत वस्ताद तानाजीराव सोरटे यांची नवनाथ सहकारी दूधसंस्थेच्या विकासासोबत शेतीतही नाव कमावले आहे. मगरवाडीच्या जिराईत माळावर खडक फोडून कमरेइतकी माती भरून त्यांनी पिके फुलविली. माळावर त्यांनी १० एकर को ८६०३२ तर ११ एकर फुले २६५ ची लागवड केली होती. उसाचे तोडीवेळी तीन तुकडे करावे लागत होते. ''सोमेश्वर''च्या यंत्रणेने मोजमाप केल्यावर को ८६०३२ चे एकरी १०७ टनांपेक्षा अधिक तर फुले २६५ चे ११० टनांपेक्षा अधिक उत्पादन निघाले. सरासरी ११०.८० टनांची निघाली. अजून त्यांचा पन्नास एकर खोडवा असून, तोही एकरी सत्तर टनांपर्यंत जाईल, असा विश्वास सोरटे यांनी ''सकाळ''शी बोलताना व्यक्त केला आहे.


शेणखत, फवारणी अन्‌ ''ठिबक'' मंत्र
स्वतःचेच गोपालन मुक्त गोठा पध्दतीचे असल्याने शेणखतात मूत्र मिसळलेले असते. ऊस वाढीस ते पोषक ठरते. दोन वेळा तणनाशक फवारणी आणि एखादी खुरपणी करून घ्यायची. तसेच दोन्ही उसबांधणीला पारंपरिक पद्धतीने वरूनच खते द्यावीत. टॉनिकची फवारणी, रोगानुसार औषध फवारणीही करून घेतात. सिंचनासाठी सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन प्रणालीच्या मंत्राचा वापर केल्याने कायम वापसा टिकून राहतो, असे व्यवस्थापन असल्याचे तानाजीराव सोरटे यांनी सांगितले.

अशी करावी लागवड
१. रान तापल्यावर उभी-आडवी नांगरट करावी
२. रोटर मारायचा आणि काकरणी करावी
३. पारंपरिक चार फुटी सरी काढावी
४. सरीमध्ये एकरी पाच-सहा डंपींग ट्रॉली शेणखत पसरावे
५. फायदेशीर ठरणार असल्याने थेट सरीलाच खत द्यावे
६. पूरलागवड पद्धतीने बेणेप्रक्रिया केलेले उसाचे कांडे लावायचे.

वीस वर्षांपूर्वी मला को ७४० वाणाचे एकरी १२० टन उत्पादन मिळाले होते. त्यानंतर प्रथमच ११० टनांवर पोचलो आहे. एरवीही ऐंशी टनांच्या पुढेच आहे. यावेळी हवामान प्रतिकूल होते तरीही व्यवस्थापन चांगले झाले. को ८६०३२ पेक्षा फुले २६५ वाणाने जास्त वाढ दिली. दर तीन वर्षाला पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातून ऊस बेणे आणून बेणे प्लॉट करणे, घरचे शेणखत वापरणे, ठिबक सिंचन यामुळे जास्त उत्पादन मिळाले.
- तानाजीराव सोरटे, ऊस उत्पादक


01426, 01425

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com