
राजगड पोलिसांच्या तत्परतेमुळे ट्रेकर सुखरूप
खेड शिवापूर, ता. ४ : कात्रज ते सिंहगड या ट्रेकदरम्यान एका ट्रेकरची तब्येत अचानक बिघडली. राजगड पोलिसांना शुक्रवारी दुपारी याची माहिती मिळाली. मात्र, त्या ट्रेकरचे नेमके लोकेशन मिळत नसताना राजगड पोलिस आणि स्थानिक नागरीकांनी डोंगर दऱ्यातून त्याच्यापर्यंत पोचून त्याला खासगी दवाखान्यात दाखल केले. राजगड पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या या कामगिरीमुळे सध्या तो ट्रेकर सुखरूप अवस्थेत आहे.
याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी माहिती दिली की, अनिवासी भारतीय असलेले घनश्याम मोतीलाल देसाई (वय ५९) आणि अभिषेक प्रमोद जैन (वय २३, रा. धुळे, सध्या डांगे चौक, पुणे) या दोघांनी शुक्रवारी (ता. ४) सकाळी अकरा वाजता कात्रज ते सिंहगड हा ट्रेक सुरू केला. मात्र, वाटेतच जैन याची तब्येत बिघडली. ही माहिती हवेली आणि राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांचे पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मिळालेल्या लोकेशनच्या आधारे आर्वी (ता. हवेली) गावातून कात्रज ते सिंहगड या ट्रेकच्या वाटेवर आडवे जात त्या दोन ट्रेकरचे शोधकार्य सुरू केले. मात्र, नेमके लोकेशन कोणते, हे समजत नव्हते. अंदाजे त्यांचा शोध घेताना झाडे-झुडपे, डोंगर-दऱ्यातून त्यांचा शोध घेणे अवघड जात होते. मात्र याही परिस्थितीत सुमारे दीड तासात राजगड पोलिस आणि स्थानिक नागरिक त्यांच्यापर्यंत पोचण्यात यशस्वी झाले. तोपर्यंत आर्वी गावात डोंगराच्या पायथ्याला रुग्णवाहिका तयार ठेवल्या होत्या. पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरीकांनी जैन याला खाली आणून खासगी दवाखान्यात दाखल केले. सध्या जैन याची प्रकृती स्थिर आहे.
फौजदार निखिल मगदूम, पोलिस हवालदार अजित माने, राहुल कोल्हे, महिला पोलिस हवलदार प्रमिला निकम, हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
उशिरा ट्रेक सुरू केल्याने उन्हामुळे अभिषेक याच्या शरीरातील पाणी कमी झाले. परंतु, त्यांचे नेमके लोकेशन मिळत नसल्याने शोधकार्यात अडथळा येत होता. मात्र, अवघड परिस्थितीत शोधकार्य सुरू ठेवत पोलिस आणि स्थानिक नागरिक त्यांच्यापर्यंत पोचले. सध्या अभिषेक याची प्रकृती स्थिर आहे.
- सचिन पाटील, पोलिस निरीक्षक, राजगड
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..