म्हाडाच्या अभियंता निवड परिक्षेत सुमीत राज्यात प्रथम

म्हाडाच्या अभियंता निवड परिक्षेत सुमीत राज्यात प्रथम

सोमेश्वरनगर, ता. २ : करंजेपूल (ता. बारामती) येथील सुमीत शिवाजी पवार या युवकाने महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अभियंता निवडीच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना सातत्यपूर्ण कष्ट करत राहिल्यामुळे त्याला हे यश मिळाले.
सुमीत हा वास्तविक सुकलवाडी (ता. पुरंदर) या गावचा. परंतु बिकट परिस्थितीमुळे त्याला आई आणि भावासह मामाकडे रहायला यावे लागले. मामा हनुमंत गायकवाड यांची स्वतःचीच फारशी चांगली परिस्थिती नव्हती पण केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी भाच्यांना, बहिणीला आधार व शिक्षणाची ताकद दिली. सुमीतची आई मीनाक्षी पवार यांनीही मजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह केला व मुलांमध्ये चांगले अधिकारी बननण्याचे स्वप्न रुजविले. सोमेश्वर विद्यालयात दहावीला असतानाच त्याने प्रथम क्रमांक मिळवून चमक दाखविली. पुण्यात सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधून डिप्लोमा तर त्यानंतर पुण्यातच व्हीआयआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. आईच्या स्वप्नातला अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा पर्याय त्याच्या समोर होता. करंजेपूल येथील कृष्णाली अभ्यासिकेत बसून रात्रंदिवस त्याने अभ्यास केला. त्याच्या चिकाटीमुळे मामा व आईनेही पाठिंबा दिला. ४६ हजार १०६ अभियंत्यांनी म्हाडाची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल प्राप्त झाला असून मनापासून लढत देणारा सुमीत चक्क राज्यात पहिला आला. तो आता कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com