
वसुंधरेच्या स्वच्छतेसाठी तरुणाई सरसावली
आळंदी, ता.३१ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आळंदीत तरुणाईंनी इंद्रायणी नदीपात्र आणि केळगाव रस्त्यावरचा कचरा उचलून एक पाऊल स्वच्छतेकडे म्हणत वसुंधरा स्वच्छता अभियान राबविले. पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे राष्ट्रीय सेवा योजना व दिघीतील ग्रीन फॉर यु टीम यांनी एकत्रितपणे नदीपात्राची स्वच्छता केली.
नदी पात्रातील तुटलेल्या मूर्त्या, जीर्ण वस्त्र, निर्माल्य, जलपर्णी, देवतांचे छायाचित्र, प्लॅस्टिक आदी कचरा सुमारे तीन तास स्वच्छता अभियान राबवत नदीपात्रातून बाहेर काढला. तरुणांसोबत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही स्वच्छतेस मदत केली. जमलेला कचरा आळंदी पालिकेच्या आरोग्य विभागाने ट्रॅक्टरमधे उचलून नेला.
धार्मिक स्थळांची, नद्यांची स्वच्छता गरजेची असून तरुणाईंनी अधिकाधिक पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे स्वच्छतेसाठी आलेल्या हिरण्मयी काटे यांनी सांगितले.
आळंदी केळगाव ग्रामपंचायतीच्या शिवेवर दररोज प्लॅस्टिक आणि घनकचरा रस्त्यावरच फेकला जातो. यामुळे येथे येणाऱ्यांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, यावर उपाययोजना राबविण्यास ग्रामपंचायत तसेच पालिका कमी पडत आहे. कचरा टाकणाऱ्या नागरिकांना शिस्त नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहतो. त्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेच्या सहकार्याने केळगाव रस्ता, हनुमानवाडी रस्ता भागातील रस्त्यावरील कचरा उचलून स्वच्छता अभियान आळंदीतील तरुणांनी राबविले.
ग्रामपंचायत आणि पालिकेने हद्दीलगत रस्त्यावरील कचरा फेकू नये यासाठी कडक पाऊल उचलून नागरिकांना शिस्त लावण्याची गरज आहे.
-अर्जुन मेदनकर, समन्वयक, स्वच्छता मोहीम जनजागृती
02302
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..