आयुक्तालय होऊनही चाकण परिसरातील गुन्हेगारी चिंताजनक

आयुक्तालय होऊनही चाकण परिसरातील गुन्हेगारी चिंताजनक

चाकण औद्योगिक वसाहत परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सध्या गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारांवर तडीपार तसेच इतर कारवाया केल्यातरी गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहेत. वर्दळीच्या ठिकाणी गोळ्या झाडून तरुणांचे खून होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्येच खून, खंडणी, धमकी, मारहाण, चोऱ्यांमुळे गुन्हेगारांची वाढती दहशत चिंताजनक बनली आहे.
-हरिदास कड, चाकण

शेलपिंपळगाव येथील तरुणाचा गोळ्या घालून झालेला खून, कान्हेवाडीतील तरुणाची हत्या, काही महिन्यांपूर्वी महाळुंगे येथील तरुणाचा दिवसाढवळ्या कोयत्याने वार करून भरचौकाजवळ झालेला खून या घटना सर्वसामान्यांना हादरवून सोडणाऱ्या होत्या. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सांगवी, पिंपरी-चिंचवड परिसरातील गुन्हेगारांनी पिस्तुलातून कोये (ता.खेड) गावच्या हद्दीत केलेला गोळीबार त्यात काही पोलिस अधिकारी, पोलिस जखमी झाले. चाकण पोलिस ठाणे व महाळुंगे पोलिस चौकीत पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा मोठा ताफा असताना स्वतंत्र गुन्हे विभाग असताना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत अशा घटना सातत्याने घडू लागल्याने औद्योगिक वसाहतीत तसेच चाकण परिसरात गुंडांच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे पोलिस आयुक्तांनी खंबीरपणे लक्ष देऊन गुन्हेगारांचे कंबरडे मोडले पाहिजे, अशी मागणी दहशतीच्या छायेतील उद्योजक, कामगार, सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

आमदार दिलीप मोहितेंकडून गुन्हेगारीबाबत खंत
चाकण येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यक्रमात खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी भाषणात चाकण औद्योगिक वसाहतीत माथाडी व ठेकेदारीतून गुन्हेगारी वाढत आहे. खुनाचे प्रकार वाढत आहेत. आयुक्तालयात चाकण, महाळुंगे परिसर गेला तरी गुन्हेगारी कमी होत नाही, याबाबत मोहिते यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्यासमोर गुन्हेगारी वाढल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर गृहमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात चाकण परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. याबाबत ती रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. एकंदरीत पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर या परिसरातील गावे आयुक्तालयात गेल्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची संख्या वाढल्यानंतरही गुन्हेगारी वाढणे हे धोकादायक आहे. गुन्हेगार न भिता पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गोळीबार करतात हे धक्कादायक आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे, ही नाही हे स्पष्ट होते.

इझी मनी आणि गुन्हेगारांची हवा...
चाकण परिसरात इझी मनी कोणत्या प्रकारे मिळेल आणि आपलीच हवी कशी राहील, यासाठी गुन्हेगार, काही पुढारी, कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. जमीन खरेदी -विक्री, कंपन्यात ठेकेदारी, कंपन्यांची उभारण्यासाठीची डेव्हलपिंग कामे व इतर कामे मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच आहे. यामध्ये कार्यकर्त्यांपासून गावचा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच अगदी पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, मावळ परिसरातील काही लोकांचा मोठा सहभाग वाढतो आहे. काही पोलिस अधिकारी, पोलिस ही त्यात गुंतले आहेत, असा ही आरोप काहीजणांकडून होत आहे. गुन्हेगारांचा वावर चाकण, महाळुंगे परिसरात वाढतो आहे. हा वावर खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात मोठा आहे. इझी मनी मिळविण्यासाठी अगदी कंपन्यांत दमदाटी, अधिकाऱ्यांना धमक्या, कामगारांना मारहाण होत आहे. त्यावर वचक बसविण्यासाठी टोळ्यांना मोक्का व इतर कारवाया करण्याची गरज आहे.

तलवारीने नव्हे, पिस्तुलाने गोळ्या झाडून खून
गुन्हेगारांकडे तसेच काही कार्यकर्त्यांकडे, ठेकेदारांकडे विनापरवाना गावठी कट्टे, पिस्तूल आहेत. कायदेशीर परवानगी घेतलेले काही लोक पिस्तूल बाळगून फिरतात. परंतु काही टोळ्यांतील गुन्हेगार, कार्यकर्ते यांच्याकडे बेकायदा गावठी कट्टे, पिस्तूल आहेत. ते सर्रास स्वतःजवळ बाळगून फिरत आहेत. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार
येथील काही गुन्हेगार कमी पैशांत गावठी कट्टे, पिस्तूल अगदी सहज उपलब्ध करून देत आहेत.

कट्टे, पिस्तुले बाळणाऱ्यांवर कारवाईची गरज
बेकायदा गावठी कट्टे, पिस्तुलांची विक्री करणारे तसेच बाळगणारे यांच्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली पाहिजेत. परंतु दुदैर्वाने त्या होत नाही. काही गुन्हेगार गुन्हा करून पोलिसांशी आर्थिक तडजोड करून सराईतपणे फिरतात, हे वास्तव भयंकर आहे. काही पोलिस अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी पैसे गोळा करण्यासाठी त्यांच्याबरोबर फिरण्यासाठी काही तरुण एजंट ठेवले आहेत. त्यांच्याकडूनही काही गुन्हेगारांना माहिती मिळते, असा अजबप्रकार सध्या सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com