भाजपचे आमदार जयकुमार गोरेही अजितदादांचे फॅन

भाजपचे आमदार जयकुमार गोरेही अजितदादांचे फॅन

बारामती, ता. २ ः ‘‘आमची राजकीय भूमिका काहीही असो पण मी अजितदादा पवार यांचा फॅन आहे. त्यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे, हे जाहीरपणे सांगायला मला संकोच वाटत नाही,’’ अशा शब्दांत भाजपचे माण (जि. सातारा) मतदारसंघातील आमदार जयकुमार गोरे यांनी आज उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

विशेष म्हणजे अजित पवारांच्या अनुपस्थितीत आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या समोर अगदी सहजतेने जयकुमार गोरे यांनी मोकळेपणाने ही कबुली दिल्याने आता नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात का, याची चर्चा सुरु झाली आहे. येथील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उदघाटन अजित पवार यांनी केले. मात्र वेळेपूर्वी तासभर येत उदघाटन उरकून अजित पवार निघून गेले होते.

जयकुमार गोरे व दत्तात्रेय भरणे चार वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि आयोजकांनी त्यांनाही व्यासपीठावर येत बोलण्याचा आग्रह केला. जयकुमार गोरे यांनी अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. राजकीय मते वेगळी असली तरी मी अजितदादांचा फॅन असल्याची कबुली देत मला हे जाहीरपणे कबूल करण्यास फार काही वाटत नाही, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. दादांकडे निर्णय घेण्याची धडाडी व धाडस आहे, ते स्पष्टवक्ते आहेत, त्यामुळे राजकारणापलिकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे, असे गोरे म्हणाले.

हाच धागा पकडत दत्तात्रेय भरणे यांनी त्यांना लगेचच राष्ट्रवादीच्या प्रवेशाचीच ऑफर देऊन टाकली. थेट ऑफर दिलेली नसली तरी तुमचा विचार असेल तर आम्हीही त्याला प्रतिसाद देऊ असे ते म्हणाले. बारामतीकरांनी हात दिला तर काहीही होऊ शकतो आणि गोरे यांच्याकडे पाहत भरणे म्हणाले, चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा, असे भरणे म्हणाले.
बारामतीत झालेल्या या राजकीय धुरळ्याने आता पुन्हा काही राजकीय समीकरणे बदलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com