
पुणे जिल्ह्यात वर्षात ३८५ किलोमीटर लांबीचे नवे रस्ते
पुणे - राज्यातील ग्रामीण भागात नवीन रस्त्यांची (New Road) निर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेचा (Road Development Scheme) दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या दुसऱ्या टप्प्यात वर्षभरात सात हजार किलोमीटर लांबीचे नवे रस्ते तयार केले जाणार आहेत. यापैकी पुणे जिल्ह्यात ३८५ किलोमीटर लांबीचे नवे रस्ते होणार आहेत. यामुळे येत्या वर्षभरात जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी ही बारा हजार किलोमीटर लांबीचा टप्पा पार करू शकणार आहे. यामुळे गाव तेथे रस्ता ही संकल्पना पूर्णत्वास येऊ शकणार आहे.
देशातील गावे, वाड्या-वस्त्या रस्त्यांनी जोडण्यासाठी केंद्र सरकारने सन १९९९ मध्ये पंतप्रधान रस्ते विकास योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत किमान पाचशे लोकसंख्या असलेली गावे आणि वाड्या-वस्त्या या पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले होते. राज्यात एकूण दहा टप्प्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानंतर ही योजना बंद झाली. त्यामुळे पंतप्रधान रस्ते विकास योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री रस्ते विकास योजना सुरु करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. यानुसार त्यांनी या योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी केली होती. मात्र २०१९ मध्ये झालेल्या सत्तांतरामुळे मुख्यमंत्री रस्ते विकास योजना पुढे चालू राहणार की ना, याबाबत पंचायतराज संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम आता दूर झाला आहे.
ग्रामीण भागातील इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गांची निर्मिती, देखभाल व दुरुस्ती, या वर्गवारीतील कच्च्या रस्त्यांचे रूपांतर हे पक्क्या रस्त्यात करणे, नवीन कच्चे व पक्के रस्ते निर्माण करणे, मुरूम रस्ते करणे ही कामे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या पंचायतराज संस्थांकडे असतात. मात्र या रस्त्यांसाठी फारसा निधी उपलब्ध नसतो. त्यामुळे या रस्त्यांच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच केंद्र सरकारने पंतप्रधान रस्ते विकास योजना सुरू केली होती. याच योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री रस्ते विकास योजना सुरु केली आहे.
राज्यातील सद्यःस्थिती
एकूण जिल्हे - ३४ (बृहन्मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून)
ग्रामीण भागातील रस्त्यांची एकूण लांबी - २ लाख १५ हजार ९०५ किलोमीटर
जिल्हा मार्गातील लांबी - ४७ हजार १०८ किलोमीटर
ग्रामीण मार्गाची लांबी - १ लाख ६८ हजार ७९६
पुणे जिल्ह्यातील सद्यःस्थिती
इतर जिल्हा मार्ग - १ हजार ९६३ किलोमीटर
ग्रामीण मार्गांची एकूण लांबी - ९ हजार ९१३ किलोमीटर
ग्रामीण मार्गांची एकूण लांबी - ११ हजार ८७६ किलोमीटर
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..