
भांबोलीत कंपन्यांचे सांडपाणी आदिवासींच्या मुळावर शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याने हक्काचा रोजगार गेल्याचा आरोप
आंबेठाण, ता. ३ : भांबोली (ता. खेड) येथे कंपन्यांमधून सोडण्यात आलेले रसायनयुक्त पाणी गावच्या पाझर तलावात सोडल्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे मासेमारी हा एकमेव व्यवसाय असलेला येथील आदिवासी ठाकर समाज रस्त्यावर आला आहे. वर्गणी काढून या आदिवासी ठाकर समाजाने सुरू केलेला हा व्यवसाय बंद पडल्याने येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
भांबोली हे चाकण औद्योगिक वसाहतीमधील टप्पा क्रमांक दोनमधील गाव आहे. गावच्या परिसरात मोठी कारखानदारी उभी राहिली आहे. वनझिरा वस्ती ही येथील ठाकर समाजाची वस्ती आहे. जमिनी एमआयडीसीत गेल्याने येथील नागरिक भूमिहीन झाले आहेत. स्थानिक असल्याने कंपन्या नोकऱ्यादेखील देत नाहीत, असा येथील स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे येथील आदिवासी ठाकर समाजाच्या तरुणांनी एकत्र येत वर्गणी काढून गावच्या पाझर तलावात मासे सोडून त्यावर आपली उपजीविका सुरू केली होती.
कंपन्यांनी त्यांचे कुठलीही प्रक्रिया न केलेले दूषित पाणी तलावात सोडल्याने विषबाधा होऊन मासे मरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे कंपन्यांनी पाणी तलावात न सोडता दूर नेवून सोडावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. या प्रसंगी रामदास कडाळे, अशोक केदारी, अनिल कडाळे, शरद कडाळे, आनंद कडाळे, दत्ता कडाळे, सुनील कडाळे, तानाजी कडाळे, अरुण कडाळे, अमर कडाळे, किरण केदारी, अतुल निखाडे, महादू राऊत, चिंधू राऊत आदी उपस्थित होते.
आमच्या वाडीवरील नागरिकांनी वर्गणी काढून तलावात मासे सोडले होते. आम्ही रात्रभर तलावाजवळ झोपून राखण करतो. आमच्या लोकांचा यावर रोजगार आहे. एमआयडीसीमुळे आम्ही भूमिहीन झालो असून, कंपन्यांत कामे मिळत नाहीत. आम्ही आता काय काम करायचे आणि काय खायचे?
- रामदास कडाळे, मच्छिमार
व्हेरॉक आणि प्लास्टिक ओम्नियम या कंपन्यांचे सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता तलावात सोडले जात आहे. आम्ही त्यांना पाणी तलावात न सोडता पुढे नेण्याची सूचना केली होती. त्यांनी पाहणीही केली होती. परंतु, नंतर त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस दिली आहे.
- भरत लांडगे, सरपंच भांबोली
Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01471 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..