
खेडच्या राजकारणात जुळली नवीन समीकरणे
आंबेठाण, ता. १३ : खेड तालुक्यात सध्या विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कधी नव्हे एवढी चुरस यावेळी सोसायटी निवडणुकीत सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय चित्र झपाट्याने बदलत असून, सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने अनेक गावांत पडलेले गट-तट एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी आजवर एकत्र असलेले दूर गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात या निवडणुकीच्या निमित्ताने काही ठिकाणी घडलं; तर काही ठिकाणी बिघडलं, अशी परिस्थिती अनुभवावयास मिळत आहे.
खेड तालुक्यात १०४ सोसायटी संस्था असून, अजून जवळपास १५ ते २० सोसायटी निवडणुका बाकी आहेत. आजपर्यंत या निवडणुकीचे आठ टप्पे पार पडले असून, जवळपास सर्वच निवडणुका शांततेत, परंतु अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडल्या. या निवडणुकीत सर्वाधिक निवडणूक चर्चेत आली ती वाकी बुद्रुक गावाची. बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव टोपे, बाजार समितीच्या माजी उपसभापती सुरेखा टोपे यांचे हे गाव. आजवर त्यांचेच या सोसायटीवर वर्चस्व होते. परंतु, त्यांच्या विरोधात माजी उपसरपंच पप्पूदादा टोपे यांनी गावातील तरुणांची फळी उभी करून निवडणूक लढवली. या कामी त्यांनी एके काळी लक्ष्मणराव टोपे यांचे खंदे समर्थक असणारेच आपल्या गोटात खेचून निवडणुकीला सामोरे गेले. यात पप्पू टोपे यांना निर्भेळ यश आले. तर, सुरेखा टोपे यांचा प्रमुख पराभव झाला. या निवडणुकीच्या निमित्ताने या गावातील दोन गट मात्र एकमेकांपासून अजूनच दूर गेले.
दुसरीकडे शहरी भागाला लागून असलेल्या चिंबळी सोसायटीची निवडणूक मात्र राजकारणात आदर्श निर्माण करणारी ठरली. आजवर एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे आणि बाजार समिती संचालक पांडुरंग बनकर यांनी एकत्र येत सोसायटी निवडणूक बिनविरोध केली. यासाठी त्यांनी आजवरची सर्व कटुता इंद्रायणी नदीत विसर्जित केली. निवडणूक झाल्यानंतर देखील तालुक्यातील अनेक ठिकाणी त्यांची कार्यक्रमाला एकत्रित होत असलेली एंट्री नव्या समीकरणाची नांदी ठरत आहे.
मताचा भाव वाढला
याशिवाय तालुक्यातील कडूस, म्हाळुंगे-सावरदरी, शिंदेगाव, चास या सोसायटीच्या निवडणुका विशेष चुरशीच्या ठरल्या. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवोदितांनी बाजी मारली असून, या निवडणुकीत तरुण निवडून येण्याचे प्रमाण मोठे आहे. गटातटाच्या संघर्षाबरोबर ही निवडणूक लक्ष्मी दर्शनाने देखील गाजत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात दोन हजारांपासून पुढे मताला भाव फुटला असून, एमआयडीसी भागातील गावात तर हा दर मताला ५० हजार रुपयांवर गेला असल्याचे बोलले जात आहे. म्हाळुंगे-सावरदरी सोसायटीच्या काट्याच्या निवडणुकीत एका मताला ५० हजार दिल्याची खमंग चर्चा आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01477 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..