
खेड तालुक्यात अव्वल ठरलेले स्मार्ट व्हिलेज ‘सावरदरी’
आंबेठाण, ता. ४ : अगदी काही वर्षापर्यंत ज्या गावाला जायला पक्का रस्ता नव्हता, पिण्यासाठी पुरेसे पाणी नव्हते त्यामुळे बाहेरची लोक या गावात मुली द्यायला तयार नव्हती तीच लोक आज आमच्या मुलीचं सावरदरीत लग्न ठरलंय असं अभिमानानं सांगतात. एवढा बदल का आणि कसा घडला? तर त्याच उत्तर आहे गावातील लोकांची एकी, सकारात्मक वृत्ती आणि परिसरात आलेली कारखानदारी. होय... सावरदरीने अल्पावधीतच कात टाकली आहे. त्यामुळे तालुक्यात स्मार्ट व्हिलेज म्हणून सावरदरी गावाने खेड तालुक्यात अव्वल स्थान पटकाविले असून आता पुढचा प्रवास सुरु केला आहे.
संपूर्ण गावावर नजर तिसऱ्या डोळ्याची
गावची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार १२२८ असून प्रत्यक्ष लोकसंख्या मात्र १५ हजाराच्या पुढे आहे. गावच्या परिसरात कारखानदारी वाढत असल्याने संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीत आणले असून सध्या ३२ कॅमेरे कार्यरत असून अजून २५ कॅमेरे गावात बसविले जाणार आहेत.
पाणीपुरवठा
संपूर्ण गावासाठी सध्या चार लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. जलजीवन मिशन अंतर्गत गावाला १ कोटी ९५ लाख निधी मंजूर असून त्याच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी आणि वापरासाठी अशा दोन स्वतंत्र जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. तसेच वाढती लोकसंख्या विचारात घेता अजून एक पाण्याची टाकी उभारण्याचे नियोजन आहे. आदिवासी बांधवांना पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने एक गुंठा जागा खरेदी केली असून त्या ठिकाणी टाकीचे काम सुरू होणार आहे.
दशक्रिया विधी घाट आणि स्मशानभूमी
मुक्ती धाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी नागरिकांना विधीच्या वेळी गरम आणि थंड पाणी सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय पक्षांना पाणी पिण्यासाठी व्यवस्था केली असून या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून वृक्षारोपण करून त्याला पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन व्यवस्था केली आहे. याशिवाय संरक्षण भिंत, सर्वत्र विद्युतीकरण, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह, २४ तास पाणी, स्वच्छतागृह, अपंगांसाठी व्यवस्था, गरम पाण्यासाठी सोलर अशी व्यवस्था केली आहे.
बहुपयोगी मैदान
गावाच्या पूर्वेला बहुउपयोगी मैदान विकसित करण्यात आले असून सकाळच्या वेळी नागरिकांना चालण्यासाठी पथ उभारले आहे. याशिवाय विवाह, वाढदिवस, सभा किंवा अन्य लहानमोठ्या कार्यक्रमांसाठी व्यासपीठ उभारले आहे. येथे वर-वधू कक्ष केले जात असून या ठिकाणचा वापर हा क्रीडा स्पर्धा किंवा व्यायाम करण्यासाठी केला जाऊ शकतो अशी व्यवस्था आहे.
घनकचरा व्यवस्थापन
गावातील ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा गोळा केला जात असून त्यासाठी दोन गाड्या कार्यरत आहे. त्यातून प्लास्टिक स्वतंत्र बाजूला केले जात असून नंतर ते पुनर्वापर करण्यासाठी बाहेर पाठविले जाते. दोन्ही कचऱ्यापासून कंपोस्ट खत केले जात असून ते गावातील गार्डन किंवा झाडांसाठी वापरले जाते. यासाठी फोर्ब्स मार्शल कंपनीचे सहकार्य घेतले जात आहे. गावात प्रत्येकाला डस्टबिन वाटप केले आहे. आठवड्यातून दोनदा रस्ते सफाई मशिनद्वारे केली जात आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने स्वतःचे औषध फवारणी यंत्र खरेदी केले आहे.
अन्य सुविधा
येथील बौद्ध विहार विकसित करण्यात आला असून त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर उभारण्यात आले आहे. याशिवाय परंपरा चालू ठेवण्यासाठी पक्का बैलगाडा घाट बांधण्यात आला आहे. गावच्या मुख्य चौकात मोठी स्क्रीन उभारली असून त्याद्वारे नागरिकांना मेसेज देण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण गावात बंदिस्त गटार योजना कार्यरत आहे. लोकसहभागातून जवळपास २ कोटींचे ग्रामदैवत गोंधळजाई देवीचे मंदिर उभारले असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याला संरक्षण भिंत उभारली आहे. संपूर्ण गावठाणासह वाडीवस्तीवर
पथदिवे बसविण्यात आले असून अंतर्गत सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत. स्थानिक कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेसाठी आरसीसी वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत इमारत देखील आरसीसी असून पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय असून मीटिंग हॉल देखील आहे.
शासकीय आणि अन्य योजना
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निराधार कुटुंबाला दरमहा २५०० ते ३००० रुपयापर्यंत किराणा दिला जातो. याशिवाय आदिवासी मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसची व्यवस्था मोफत करण्यात आली असून त्यात घर ते जिल्हा परिषद शाळेपर्यंतचा मोफत प्रवास याचा समावेश आहे. याशिवाय महिलांसाठी चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण नाममात्र शुल्कात दिले जाते. तर ब्युटीपार्लर आणि मशिन क्लासचा सर्व खर्च ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केला जातो. अशा प्रकारे ग्रामपंचायतीने कधी स्वनिधी, लोकवर्गणी किंवा कधी लोकप्रतिनिधी निधी यांचा मेळ घालत गावात विकासाचे एक नवे पर्व उभे केले आहे.
२१५८
२१५९
Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01491 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..