
पावसामुळे तुटला गोनवडीचा संपर्क
आंबेठाण, ता.१३ : मागील चार ते पाच दिवसांपासून खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यात आज (ता. १३) पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहे. गोनवडी ते चाकणला जोडणाऱ्या रस्त्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने दळणवळण बंद पडून गावचा संपर्क तुटला आहे.
मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांची मोठी अडचण झाली आहे. अनेकांना कामाला न जाता पुन्हा घरी परतावे लागले आहे. चार ते पाच किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी पाणी वाहत येत असल्याने पाण्याचा मोठा प्रवाह आहे.
याशिवाय जोरदार पाऊस सुरू असल्याने भात पिके अनेक ठिकाणी वाहून गेली आहेत तर सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन पिकाचे झाले आहे. शेताचे बांध वाहून गेले असून पाण्याबरोबर माती आणि पिके वाहून गेली आहेत.
चाकण, बिरदवडी मार्गे येताना हा रस्ता पुढे गोनवडी गावाला जोडत असून पुढे बोरदरा गावाला रस्ता जातो. परंतु या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने वाहने ने-आण करता येत नसून संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
सातत्याने पावसाचा जोर वाढत असल्याने पुलावरून वाहणारे पाणी अजून वाढू शकते.त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन सरपंच संदीप मोहिते पाटील, माजी सरपंच वसंत तनपुरे, मोतिराम मोहिते पाटील, धनंजय तनपुरे, अमोल मोहिते पाटील आदींनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तत्काळ त्यांचे पंचनामे करावे, तसेच तातडीची आर्थिक मदत शेतकऱ्यांना करावी. गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाण्याचा मोठा प्रवाह येत असल्याने नागरिक आणि प्रवासी यांनी शक्यतो बाहेर पडणे टाळावे.
-दिनेश मोहिते पाटील, संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
02223
Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01526 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..