टाकला कचरा तर होईल टक्कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकला कचरा तर होईल टक्कल
टाकला कचरा तर होईल टक्कल

टाकला कचरा तर होईल टक्कल

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १ : कचरा ही सर्वत्रच मोठी समस्या होऊन बसली आहे. चाकणजवळ असणाऱ्या बिरदवडी गावात देखील कचरा ही गंभीर आणि प्रमुख समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी फलक लावून कचरा टाकणाऱ्या नागरिकांना सावध केले आहे. आणि जर एवढे सांगूनही कचरा टाकलाच तर कशा पद्धतीने उत्तर दिले जाईल, याबाबत नागरिकांना जाहीर समज दिली आहे.

बिरदवडी गावाच्या दक्षिणेला आणि मुख्य वर्दळीच्या चाकण-आंबेठाण रस्त्याला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले होते. खाणीत टाकला जाणारा कचरा रस्त्यापर्यंत आल्याने आणि त्यात सांडपाणी साचून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. येथील कचरा चाकण नगरपरिषदेच्या माध्यमातून उचलला आहे. मात्र, पुन्हा या ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. तरीदेखील काही कामगार, प्रवासी या ठिकाणी कचरा टाकताना आढळून आले. जेव्हा स्थानिक नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले, तेव्हा या कचरा टाकणाऱ्यांनी जाहीर माफी तर मागितलीच, पण पुन्हा कचरा टाकणार नाही, याबाबत ग्वाही दिली.
तरीदेखील नागरिकांनी अशा प्रकारे कचरा टाकू नये, यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी फ्लेक्स लावले असून, त्याबाबत कचरा टाकणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. यात कोणी कचरा टाकताना आढळला तर त्याचे टक्कल केले जाईल, जसे घर स्वच्छ ठेवता तसा परिसर स्वच्छ ठेवा, कचरा टाकण्याचा नाद केला तर बाद होईल, गाढवाचप्रमाणे कचरा टाकू नये, अशी वाक्य लिहून नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे.
गावातील तरुण गटागटाने राहून कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर लक्ष देत आहेत. रात्री देखील या भागात गस्त घातली जात आहे. यात जर कोणी कचरा टाकताना आढळला, तर त्याला जागेवर शिक्षा देऊन कचरा त्यासोबत परत पाठविला जात आहे. यापुढे जर असे कोणी कचरा टाकताना आढळले; तर त्याचा जागेवरच टक्कल केला जाईल, असा इशारा तरुणाईने दिला आहे. बिरदवडी ग्रामपंचायतीने उचललेल्या या अनोख्या पावलांचे कौतुक केले जात असून स्थानिक नागरिक, प्रवासी आणि विशेषतः कामगार यांनी मात्र या धडक कारवाईचा मोठा धसका घेतला आहे.

या उपायांमुळे सध्या तरी येथील कचरा समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना यश येत असून, नगरपरिषदेने या रस्त्याकडेची सफाई केली आहे. बिरदवडी गावच्या दक्षिणेला परंतु खराबवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या खाणीत चाकण नगरपरिषद आणि अन्य काही ग्रामपंचायतींचा कचरा टाकला जात आहे. त्यातून सुटका करण्याची मागणी बिरदवडी नागरिकांनी चाकण नगरपरिषदेकडे केली होती. नगरपरिषदेच्या वतीने जेसीबी मशिन आणि काही कर्मचारी लावून रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा काढून परिसर स्वच्छ केला.

नागरिकांनी आणि प्रवाशांनी रस्त्याच्या कडेला कचरा न टाकता घरोघरी येणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकावा. कचरा समस्या सोडविण्यासाठी गावातील तरुण आणि महिलांनी जो पुढाकार घेतला आहे, त्याचे कौतुक असून, त्याला ग्रामपंचायतीचे सर्वतोपरी सहकार्य राहील.
- दत्तात्रेय गोतारणे, सरपंच, बिरदवडी (ता. खेड)