
खेड तालुक्यात सजाच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महसूलकडून कॅम्प
आंबेठाण, ता. २१ : ‘‘महसूल विभागाच्या माध्यमातून पोटखराबा क्षेत्राचा पंचनामा करून त्याची नोंद लागवडी योग्य क्षेत्रात करण्यासाठी आणि ४२ ड अंतर्गत जमीन धारकांना नोटिसा देण्यासाठी प्रत्येक सजाच्या ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,’’ असे आवाहन खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, चाकणचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी आणि तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केले आहे.
खेड तालुक्यात प्रत्येक सजाच्या ठिकाणी याबाबत कॅम्प घेण्यात येणार असून त्याबाबत कोतवालामार्फत दवंडी दिली जाणार आहे. तसेच, मंडलाधिकारी वगळता अन्य अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक सजाच्या ठिकाणी होणाऱ्या या कॅम्पमध्ये अ वर्ग पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणला असेल तर तसा जबाब आणि पंचनामा करणे आणि ४२ ड म्हणजे गावठाण हद्दीपासून २०० मिटर अंतरापर्यंतचे गट अकृषिक होणार आहेत.