
भांबोली येथे उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान
आंबेठाण, ता. २२ : शिवजयंती महोत्सवानिमित्त भांबोली (ता. खेड) येथे राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पसायदान फाउंडेशनच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.
भांबोली येथील भामचंद्र विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. शिवजयंती आणि गाथा चैतन्य महाराज वाडेकर हिच्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार अमोल कोल्हे, येरवडा तुरुंग अधिकारी चंद्रमणी इंदुरकर, ज्ञानेश्वर मेश्राम, अवधूत गांधी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, कैलास लिंभोरे, सुनील देवकर, काळूराम पिंजण, अमोल पानमंद, विनायक मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी युवा शाहीर रामानंद उगले यांनी पोवाडे, भारुड सादर केले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना स्त्री शक्ती पुरस्कार, पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक किरण सावंत यांना उद्योग भूषण पुरस्कार, येरवडा तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदूरकर यांना सेवा पुरस्कार, आसखेड येथील प्राची कैलास लिंभोरे यांना संगीत साधना पुरस्कार, कोल्हापूर मधील हुपरी येथील विलासराव नाईक यांना संस्थात्मक कामगिरीसाठी समाजभूषण पुरस्कार, इचलकरंजी येथील डॉ. प्रतिभा भारत पैलवान यांना साहित्य साधना पुरस्कार, कोल्हापूर अबोली हसन जिगजीनी यांना कन्यारत्न पुरस्कार तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना मदत करणारे सचिन ढवळे यांना ज्ञान साधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आभार चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले.
स्त्रीच्या जन्माचे केलेले स्वागत ही कौतुकास्पद बाब आहे. आमची लढाई समाजातील विकृती विरोधात आहे. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात मुलींची संख्या आदिवासी भागापेक्षा कमी असणे ही खंत आहे. कायद्यापेक्षा संप्रदायाची भाषा महत्त्वाची आहे. कारण कायद्यात पळवाटा असतात.
-रूपाली चाकणकर, अध्यक्ष, महिला आयोग