शिंदेगाव सरपंचपदासाठी चुरस

शिंदेगाव सरपंचपदासाठी चुरस

आंबेठाण, ता. ७ : शिंदेगाव (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर दोन सदस्य अनपेक्षितपणे सहलीवर गेले आहेत. त्यामुळे येथे सरपंच कोण होणार? याकडे लक्ष लागले आहे.
शिंदेगावच्या राजकीय इतिहासात आजवर दोन गट कायम अस्तित्वात असायचे आणि तोच प्रकार आजही आहे. सुरवातीच्या काळात राजकीयदृष्टीने संवेदनशील गाव, त्यानंतर डाऊ आंदोलनाने जगाच्या नकाशावर आलेले आणि आता बहुराष्ट्रीय कंपन्या आल्याने शिंदेगाव कायम चर्चेत आहे. गावची पंचवार्षिक निवडणूक सन २०२० मध्ये झाली. सरपंचपद खुले आहे. त्यासाठी सुरवातीला मोठी चुरस होती. त्यात सचिन देवकर यांनी बाजी मारीत सरपंचपद पटकाविले. यात भावकी हा फॅक्टर महत्त्वाचा ठरला. ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्याने राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा अंदाज होता. त्यांनी सर्वसमावेशक काम केले. त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने गावातील दुसरा गट सक्रिय झाला असून, त्यांच्याकडून गावची सत्ता खेचण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी सरपंच निवड जरी बिनविरोध झाली असली, तरी राजकीय बलाबल सहा विरुद्ध तीन, असे होते. आता सुरवातीला निवडणूक शांततेत पार पडेल, असा अनेकांचा कयास होता. परंतु, सत्ताधारी गटातील दोन सदस्य अचानक सहलीवर गेले आहेत. त्यामुळे वातावरण तापले आहे. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. परंतु, सहलीवर गेलेले सदस्य मात्र आम्ही स्वखुशीने बाहेर आलो असून, निवडणुकीच्या दिवशी पुन्हा येणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे गावात चर्चांना उधाण आले आहे. सगळ्यांचे लक्ष उद्या (ता. ८) होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com