निर्वीच्या आखाड्यात २०० पहिलवान

निर्वीच्या आखाड्यात २०० पहिलवान
Published on

आंधळगाव, ता. २८ : निर्वी (ता. शिरूर) येथील व परिसरातील हिंदू-मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत बालेशावली बाबांचा तीन दिवसीय यात्रा उत्सव शनिवार (ता. २५) ते सोमवारपर्यंत (ता. २७) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला.
यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने मनोरंजनासाठी पहिल्या दिवशी साहेबराव नांदवळकर लोकनाट्य तमाशा व दुसऱ्या दिवशी ‘नटखट सुंदरा’ हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य कुस्त्यांच्या आखाड्यात विविध भागातील २००हून अधिक पहिलवानांनी भाग घेतला. मध्य प्रदेश, पारनेर, श्रीगोंदा, नगर, पुणे, इंदापूर, शिरूर, दौंड, बारामती, कर्जत तालुक्यातील पहिलवान आखाड्यात सहभागी झाले होते. मुलींनी केलेली कुस्ती लक्षवेधक ठरली. बालेशावली बाबांच्या मंदिराजवळ कुस्त्यांचे मैदान बनविण्यात आले होते. दुपारी साडेचार वाजता कुस्त्यांच्या आखाड्याचे उद्‍घाटन आयकर विभागाचे अधिकारी संदीप पवार, अरविंद सोनवणे यांच्या हस्ते केले. या वेळी घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख माउली कटके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर फराटे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील आदी उपस्थित होते.
विविध भागातून आलेल्या मुलींनी लक्षवेधक कुस्त्या करून आखाड्यातील नागरिकांकडून वाहवा मिळविली. बांगडी व लांगी डाव टाकत प्रतिस्पर्धी पहिलवानांवर मात केली. २०० रुपयांपासून ते अकरा हजार रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. पहिलवानांना एकूण एक लाख रुपये इनाम बक्षीस म्हणून वाटण्यात आला. विजयी पहिलवानांना ७० टक्के व पराभूत पहिलवानाला ३० टक्के रक्कम विभागून देण्यात आली. इनामाव्यतिरिक्त ग्रामस्थांनी पहिलवानांना वैयक्तिक रोख बक्षिसांची खैरात केली. तात्यासाहेब सोनवणे, अनिल वाबळे, नीलेश सोनवणे, सचिन नलगे, सचिन सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, मोहन सोनवणे, दत्तात्रेय पवार, नामदेव सोनवणे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com