
वंचितांना अन्नदान करण्यासाठी सरसावणारी अंजली
पुण्यात होस्टेलमधे राहून शिक्षण घेताना कोरोनासारख्या महामारीमुळे अचानक लॉकडाउन घोषित केला आणि सर्व रहाटगाडगे एका ठिकाणी थांबले. मीही माझ्या आळंदीतील घरी परतले. हाताला काम नाही, रहायला छप्पर नाही. पोटात एकवेळचे अन्न कसे पडेल याची चिंता अनेकांना सतावत होती. अशावेळी माझे वडिल अजित वडगावकर यांनी वंचितांच्या खाण्यापिण्याची सोय करावी, असा विचार केला अन् लगेच ते कामाला लागले. मी पण त्यांना सहकार्य करण्यासाठी धावले.
- अंजली अजित वडगावकर, आळंदी देवाची.
वडिलांच्या अन्नदानाच्या कार्यात जलाराम सत्संग मंडळ, जैन संघ, नाकोडा मंदिरने लाखमोलाची मदत केली. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वजण घरात बसले. माझे वडील मात्र असे घराबाहेर का फिरतात, मला पडलेले कोडेच होते. आणि मग मीही त्यांच्यासोबत अन्नदानसाठी आळंदीच्या इंद्रायणीतीरावरील भिक्षेकरी, बेरोजगार लोकांच्या मदतीसाठी धावले. माझे वडील एवढ्या तळमळीने का बाहेर पडले याचा उलगडा मला नदीकिनारी गेल्यावर झाला आणि एका लॉकडाउनमुळे एवढी दैना लोकांच्या आयुष्यात येवू शकते हे माझ्यासारख्या होस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनीला न पटण्यासारखे होते.
लॉकडाउनमधील ती परिस्थीती पाहून मला सत्याची जाणीव झाली. अनेक लोक संकटातून मार्ग काढतात. कुणी त्यांना मदत करतात आणि पुढे मार्गस्थ होतात. माझे वडील त्यापैकीच एक होते आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मीही पुण्यकार्यात सहभागी झाले.
संपूर्ण लॉकडाउनच्या काळात इंद्रायणीतीरी तसेच आळंदीतील गल्लीबोळात गरजवंतांच्या दारी जावून तब्बल दिडशेहून अधिक दिवस अन्नदानाची सेवा केली. संसारात अन्नदाना सारखे श्रेष्ठदान पूर्वी नव्हते व पुढेही नसेल. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कधी कमी होत नाही, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होते. वाढते तसेच. वंचित घटकांना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे चित्र माझ्यासारख्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीसाठी चिरकाल आठवण देणारे होते. खरेतर माझ्या कुटूंबात आईसह माझ्या वडिलधाऱ्यांना माझ्या प्रकृतीबाबत चिंता होती. कोरोनासारख्या महामारीत बाहेर पडणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखेच होते. मात्र माझा हूरूप आणि वडिलांसोबत घडणारी समाजसेवा मला भावि आयुष्यासाठी प्रेरणादायी होती. मी दररोज जेवण घेऊन स्वतः माझी चारचाकी गाडी चालवित वंचितांपर्यंत जाई. प्रत्येक ठिकाणी लोक रांगेत उभे राहून वाट पाहत असे. रांगेत उभ्या लोकांच्या हातात जेवण देताना मला कधीही थकवा आला नाही. संपूर्ण लॉकडाऊन काळात मी अन्नदानात सहभाग घेतला. हे पुण्याचे काम करताना कोरोनासारख्या संकटावर मात करण्याचे बळ मला आपोआपच मिळाले. दुसयाचे दुखः जाणले आणि त्यानुसार सेवा केली की आपण आपोआप सुखरूप राहतो. मला माझ्या वडिलांनी लॉकडाउनमधे जीवन जगण्याचा शिकवलेला वस्तूपाठ होता. केवळ शिक्षणच नाही तर शिकता शिकता तुम्ही लोकोपयोगी काम करू शकता.लॉकडाउनमधे झालेली समाजसेवेचा पाठ विविध रूपाने आजही जोपासत आहे.
02558, 02559
Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01385 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..