
आळंदीकरांना पावला वाहनतळाचा ठेका
आळंदी, ता. १४ : आळंदीतील इंद्रायणीकाठच्या झाडीबाजाराच्या जागेतील वाहनतळाचा ठेका चालू वर्षी साठ लाख रुपयांना गेला. त्यामुळे या वाहनतळाचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास पाच पटीने वाढणार आहे.
पालिकेला उत्पन्नाचा भाग म्हणून आणि आळंदीत येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची सोय व्हावी, यासाठी इंद्रायणीकाठी मध्यवर्ती भागात पालिकेने पंधरा वर्षांपूर्वी वाहनतळ सुरू केले होते. मात्र, पालिकेला उत्पन्न कमी मिळून ठेकेदारच मलिदा खात असे. अनेकदा अनामत रकमाही ठेकेदाराने वेळेत न भरल्याने ठेके रद्द केले होते. मात्र, तरीही वाहनतळाच्या माध्यमातून अनेकांनी स्वतःचे खिसे भरले. गेली दोन वर्षात तर पालिकेने स्वतःचे कर्मचारी नेमून वाहनतळ शुल्क वसुली केली. त्यावेळी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात अवघे सहा लाख रुपये आणि सन २०२१-२२ मध्ये पावणेतेरा लाख रुपये वर्षाकाठी उत्पन्न पालिकेला मिळाले. सन २०१८-१९ ला पंचेचाळीस लाखांची वसुली झाली होती. मात्र, मागील दोन उत्पन्न घटण्यामागचे कोरोनाचे कारण सांगितले, तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच होती. मात्र, यंदाच्या वर्षी पालिकेने ठेकेदारामार्फत वाहनतळात शुल्क वसुली, निविदा प्रक्रिया राबवून सुरू केली. साठ लाख रुपयांचा वार्षिक ठेका गेल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली.
तसेच, आळंदीतील वडगाव रस्त्यावर जलाराम गोशाळेशेजारी नुकतेच वाहनतळ विकसित केले. मात्र, त्याचाही लिलाव केला, तर पालिकेला उत्पन्न आणि वाहनचालकांची सोय होणार आहे.
निम्मी वसुलीही जमा
याबाबत पालिकेच्यावतीने प्रशासनाकडून सांगण्यात आले की, पूर्वी ठेकेदाराकडून जुजबी अनामत रक्कम ठेवून झालेल्या वसूलीतून पैसे पालिकेत जमा होई. आता मात्र वार्षिक ठेक्यातील देयक रकमेतून पंधरा लाख रुपयांचे चार हप्ते ठेकेदारास ठरवून दिले. सुरवातीच्या सहा महिन्यांची रक्कम ठेकेदाराने ठेका सुरू करण्याअगोदरच जमा करण्याची आहे. त्यामुळे त्यापैकी पंधरा लाख रुपये सध्याच्या ठेकेदाराने भरले. उर्वरित पंधरा लाख रुपये भरणे बाकी आहे. ते येत्या आठवडाभरात भरून घेणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01400 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..