
आळंदीत अतिक्रमणांवर जुजबी कारवाई
आळंदी, ता. १३ ः शहरात महाद्वार आणि प्रदक्षिणा रस्त्यावर अतिक्रमण आणि अनधिकृत फ्लेक्स बोर्डवरील आज चौथ्या दिवशी केलेली कारवाई जेमतेम स्वरूपातच केल्याचे चित्र आहे. पालिका कर्मचाऱ्यांचे बोटचेपे धोरण आणि राजकीय संरक्षणामुळे अनेक अतिक्रमणे आहे तशीच आहेत.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रस्ता व फुटपाथवरील बेकायदा टपरी हातगाडीच्या अतिक्रमणांवर आळंदी पालिकेने थेट जेसीबी लावून गेली तीन दिवस जमीनदोस्त केली. शहरात अतिक्रमणाचे पेव फुटले होते. वारीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलिस उपायुक्त प्रेरणा कट्टे यांनीही सरसकट अतिक्रमणे काढण्यास मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना सांगितले होते. मात्र,आज कारवाई काही ठराविक ठिकाणीच केली गेली. मंदिरापुढील प्रसाद विक्रीची दुकाने, पेढेवाल्यांची पातेली कारवाईत हटविली. तर जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत फ्लेक्सही काढण्याचे काम सुरु होते. परंतु, अनेक ठिकाणी कारवाई जुजबी स्वरूपाची होती. अतिक्रमण आणि फ्लेक्सवरील कारवाई संथगतीने सुरु होती. काही ठिकाणी गेल्या तीन दिवसात हटवलेले टपरीवाले पुन्हा दुकान थाटून बसले आहेत. यामुळे कारवाई झाली पण पुन्हा त्यावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता पालिकेने घेणे आवश्यक आहे.
धोकादायक इमारती तशाच उभ्या
गेल्या वर्षभरात धोकादायक आणि पडण्यालायक इमारती हटविण्याबाबत पालिकेने अनेक जागा मालकांना नोटीस बजावल्या. मात्र, पुढील कार्यवाही न केल्याने धोकादायक इमारती तशाच उभ्या आहेत. तर पालिकेचे मोक्याचे भूखंड बळकावून दुकाने थाटली आहेत. न्यायालयात काहींचे निकाल पालिकेच्या बाजूने लागले. मात्र, अद्याप पालिकेने जागा ताब्यात घेतल्या नाहीत.
Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01404 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..