आळंदीतील वातावरण भक्तीमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील वातावरण भक्तीमय
आळंदीतील वातावरण भक्तीमय

आळंदीतील वातावरण भक्तीमय

sakal_logo
By

आळंदी, ता. १७ : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी परंपरेने भाविकांचे आगमन आळंदीत होऊ लागले आहे. एकीकडे प्रशासनाची भाविक वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची लगबग, तर दुसरीकडे वारकऱ्यांचा धर्मशाळांमधून हरिनामाचा गजर सुरू झाल्याने आळंदीत वातावरण भक्तीमय झाले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २१) होत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होईल. दरम्यान परंपरेने घराण्यात चालत आलेली वारी माऊलीचरणी रुजू करण्यासाठी राज्यभरातून भाविक येवू लागले आहेत. खास करून मराठवाड्यातील भाविकांची उपस्थिती जाणवत आहे. गोपाळपुरा, वडगाव रस्ता, दत्त मंदिर रस्ता या भागात धर्मशाळांमधून भाविकांचा मुक्काम दिसून येत आहे. सिद्धबेटातही भाविकांची गर्दी दिसून येत आहे. ठिकठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ करताना भाविक दिसत आहेत. भाविकांच्या आगमनाने आळंदीत वातावरण भक्तीमय होण्यास सुरवात झाली. आळंदीत आल्यावर धर्मशाळांची सफाई, वारीसाठी तंबूचे साहित्य, शिधा खरेदी करण्याची लगबग दिंडीचालक करत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे वारकऱ्यांना सोयीसुविधा देण्याची प्रशासनाची लगबग दिसून येत आहे. पालिका, महसूल खात्याबरोबर पोलिसांचाही बंदोबस्त लक्षणीय आहे. गुरुवारपासून (ता. १६) होमगार्ड आणि पोलिस बंदोबस्तासाठी रुजू होत आहेत. दरम्यान, संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी शहरात दोनशे दहा सिसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तर, वारकऱ्यांना आणि पोलिसांना दक्षतेबाबतच्या सूचना, तसेच हरविलेल्या व्यक्तींच्या शोध घेण्यासाठी पब्लिक अनांऊसिंग सिस्टीमसाठी ५८ ध्वनिक्षेपक लावले आहेत.

कडेकोट बंदोबस्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पायी वारीस परवानगी असल्याने भाविकांची मोठी गर्दीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा बंदोबस्तही मोठा आहे. दोन उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त, 82 पोलिस निरिक्षक, एकशे ऐंशी पोलिस उपनिरीक्षक, अकराशे पोलिस अंमलदार, दोनशे वाहतूक पोलिस , पस्तीस वॉर्डन, सहाशे होमगार्ड, एसआरपीएफ, एनडीआरएफचे पथक, अशा पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. होमगार्ड आणि पोलिसांची गर्दी जाणवू लागली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01441 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top