अवजड वाहनाने घेतला अमितचा जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Deshmukh
अवजड वाहनाने घेतला अमितचा जीव

अवजड वाहनाने घेतला अमितचा जीव

आळंदी - वाशीम जिल्ह्यातून आलेल्या अमित विठ्ठलराव देशमुख या एकोणीस वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा सोमवारी (ता. १८) डंपरच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला होता. आळंदीतच (ता. खेड) शोकाकूल वातावरणात नातेवाइकांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी वाशीम जिल्ह्यातून आलेल्या अमितच्या अपघाती मृत्यूने वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त होत आहे.

आळंदीतील गजबजलेल्या ठिकाणी असणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळेच अमितचा जीव गेल्याने समस्त आळंदीकर तसेच वारकरी सांप्रदायामधून संताप व्यक्त होत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील लिंग गावचे अमित तीन वर्षांपूर्वीच आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत अभ्यास करण्यासाठी आले. संस्थेत पहिल्या वर्षाच्या वर्गाला शिकत असल्याची माहिती सोबतच्या वारकरी विद्यार्थ्यांनी दिली. अतिशय मितभाषी मनमिळाऊ स्वभाव होता. मात्र काही कामानिमित्त पुण्यात नातेवाइकांकडे गेले होते. पुण्यातील वारजे येथून त्याच्या जवळच्या नातेवाइकांनी त्याला सोमवारी (ता.१८) भाड्याने रिक्षा ठरवून थेट आळंदीतील वडगाव रस्त्यावरील विठ्ठलबाबा देशमुख धर्मशाळेत सोडण्यास सांगितले. सायंकाळी पाचच्या दरम्यान रिक्षावाला आळंदीत भैरोबा चौकात आल्यावर रिक्षावाल्याने अमित यांना चौकातच सोडले. रिक्षातून उतरल्यावर अमित धर्मशाळेच्या दिशेने थोडे पुढे चालत जात असताना अमितला डंपरने पाठीमागून उडविले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

आणि कदाचित जीव वाचला असता....

पुण्यापासून थेट आळंदीपर्यंत रिक्षा भाड्याने घेऊन देशमुख आले. आळंदीतील भैरवनाथ चौकापासून अवघ्या शंभर मीटरवर ते राहत असलेली धर्मशाळा होती. मात्र भैरवनाथ चौकात न उतरता ती रिक्षा थेट धर्मशाळेपर्यंत नेली असती तर कदाचित देशमुख यांचे प्राण वाचले असते अशी चर्चा चौकातील नागरिक करत होते.

अतिक्रमणे, हातगाड्यांची वाढती संख्या

आळंदीत सध्या चार ते पाच हजार वारकरी विद्यार्थी चार ते चाळीस वर्षे वयोगटातील आहेत. तसेच इतर विद्यार्थीही आळंदीतील विविध शाळेत ये-जा करतात. मात्र आळंदीतील रुंद रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी असतात. पदपथावरील अतिक्रमणे, हातगाड्यांची वाढती संख्या आणि पालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. यामुळे आणखी किती बळी गेल्यावर पदपथावरील प्रशासन अतिक्रमण काढून चालण्यासाठी मोकळे करणार याचीच चर्चा आळंदीत होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01488 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..