कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा
कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा

कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा

sakal_logo
By

आळंदी, ता. १९ ः आकर्षक पुष्पांनी सजविलेल्या गाभाऱ्यात चांदीचा मुखवटा ठेवून सजविलेले समाधीवरील माऊलींचे लोभस रूप डोळ्यात साठवीत माऊली भक्तांनी टाळमृदंगाच्या गजरात ‘कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा’ असे म्हणत माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी, घंटानाद करत आळंदीतील देऊळवाड्यात माऊलींचा जन्मोत्सव साजरा केला.
यंदा कोरोना निर्बंध नसल्याने देऊळवाड्यात आळंदीकर भाविकांची माऊलींच्या जन्मोत्सवासाठी मोठी केली गर्दी होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. परंपरेनुसार देवस्थानकडून हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. नित्य परंपरेनुसार पावणे सात ते नऊ गुरुवारी माऊलींची पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्री धुपारती व हरिपाठ झाला. त्यानंतर रात्री दहा ते बारा आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. अभय टिळक यांचे पंखा मंडपात कीर्तन आणि वीणा मंडपात आळंदीकरांचे गावकरी भजन एकाच वेळी सुरू झाले. आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने कारंजे मंडप, मुक्ताबाई मंडप, गणेश मंडप, विठ्ठल रुक्मिणी मंडपात उपस्थित होते. दरम्यानच्या काळात प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते कृष्णजन्माचे पूजन झाले. त्यानंतर वेध लागले ते माऊलींच्या जन्माचे. पुजारी विजय कुलकर्णी, राजाभाऊ चौधरी, अमोल गांधी, नाना चौधरी या ब्रम्हवृंदांनी मुख्य समाधी गाभारा स्वच्छ केला. चांदीचा मुखवटा ठेवून समाधी सजविली. पंखा मंडपात डॉ. टिळक यांनी बाराच्या दरम्यान कीर्तनात माऊली जन्माचे वर्णन करताच भाविकांनी समाधीवर पुष्पवृष्टी करत माऊलींची आरती, त्यानंतर संत तुकाराम महाराजांची आरती करून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर घंटानाद, पेढे, सुंठवडा वाटप करून माऊली जन्मोत्सवाची सांगता झाली. आळंदी देवस्थानच्यावतीने मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. यावेळी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांची उपस्थिती होती. माऊली जन्मानंतर जागराचा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान आळंदीकरांनी मंदिरात भाविकांना फराळ आणि दूध वाटप केले. आज शुक्रवारी (ता. २०) बापूसाहेब देहूकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

2858

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01521 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..