आळंदीत १७ तारखेपासून कार्तिकी वारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत १७ तारखेपासून कार्तिकी वारी
आळंदीत १७ तारखेपासून कार्तिकी वारी

आळंदीत १७ तारखेपासून कार्तिकी वारी

sakal_logo
By

आळंदी, ता. ४ ः संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीस कार्तिक वद्य अष्टमीपासून (ता. १७) देऊळवाड्यासमोरील महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरूवात होईल. वारीतील मुख्य सोहळा कार्तिकी वद्य एकादशी (ता. २०) आणि माऊलींचा समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला (ता. २२) साजरा केला जाणार आहे.
कार्तिकी वारी सोहळ्यानिमित्त मंदिरात हरिनाम सप्ताह प्रतिपदेपासून (ता. १४) सुरू झाला. कार्तिकी वारीचा मुख्य सोहळा पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने कार्तिक वद्य अष्टमीला (ता. १७) सुरू होईल. सायंकाळी साडे सहा ते आठ वीणा मंडपात योगिराज ठाकूर, रात्री नऊ ते अकरा बाबासाहेब आजरेकर यांच्यावतीने किर्तनसेवा तर रात्री दहा ते पहाटे चारपर्यंत वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, हैबतबाबा आरफळकर यांच्यावतीने क्रमानुसार जागराचा कार्यक्रम होईल.
दुसऱ्या दिवशी नवमीला (ता. १८) वीणा मंडपात सायंकाळी साडेसहा ते साडेआठ बाबासाहेब देहूकर, रात्री साडेनऊ ते अकरा वासकर महाराज यांचे कीर्तन व दशमीला सायंकाळी साडेचार ते साडेसहा गंगूकाका शिरवळकर, साडेसहा ते साडेआठ धोंडोपंतदादा अंत्रे, रात्री नऊ ते अकरा वासकर महाराज यांचे कीर्तन व त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा वाल्हेकर यांच्यावतीने जागर होईल.
कार्तिकी वद्य एकादशीला (ता. २०) मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर अकरा ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चाराने पहाटपूजा केली जाईल. दुपारी एकच्या दरम्यान माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. रात्री बारा ते दोन मोझे यांच्यावतीने जागर होईल. कार्तिकी वद्य द्वादशीला (ता. २१) मध्यरात्री शासकीय पूजा जाईल. दुपारी चारच्या दरम्यान माऊलींचा चांदीचा मुखवटा रथामध्ये ठेवून नगरप्रदक्षिणेसाठी रथोत्सव केला जाईल. दुपारी चार ते सहा हरिभाऊ बडवे यांचे कीर्तन, रात्री नऊ ते अकरा केंदूरकर यांच्यावतीने कीर्तन होईल.
कार्तिकी वद्य त्रयोदशीला (ता. २२) माऊलींच्या संजीवन समाधी दिन असल्याने मध्यरात्री माऊलींच्या समाधीवर प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते पवमान पूजा केली जाईल. सकाळी सात ते नऊ हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्यावतीने कीर्तन, सकाळी साडेसात ते साडेनऊ वीणा मंडपात आळंदी देवस्थानच्यावतीने कीर्तन, सकाळी सात ते नऊ आणि नऊ ते अकरा भोजलिंग काका मंडपात दाणेवाले निकम दिंडीच्यावतीने कीर्तन सेवा होईल. सकाळी दहा ते बारा संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज नामदास महाराज यांचे समाधी सोहळ्याचे मुख्य कीर्तन होईल. त्यानंतर पुष्पवृष्टी, घंटानाद आणि आरती झाल्यानंतर सोहळा पार पडेल. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वीणामंडपात सोपानकाका देहूकरांचे कीर्तन होईल. रात्री बारा ते पहाटे चार हैबतबाबा आरफळकर यांच्यावतीने जागराचा कार्यक्रम होईल. कार्तिकी वद्य अमावस्येला (ता. २३) रात्री साडे नऊनंतर पालखी सोहळ्याची छबिना मिरवणुकीने सांगता होईल.