आळंदीत वाहनांना गुरुवारपासून बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत वाहनांना गुरुवारपासून बंदी
आळंदीत वाहनांना गुरुवारपासून बंदी

आळंदीत वाहनांना गुरुवारपासून बंदी

sakal_logo
By

आळंदी, ता. १४ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने वगळता अन्य वाहनांना गुरुवार (ता. १७) ते बुधवार (ता. २३) या कालावधीत आळंदी आणि परिसरात प्रवेश बंदी केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.

नाकाबंदीची ठिकाणे
१) मॅगझीन चौक (पुणे-आळंदी रस्ता)
२) डुडुळगाव जकात नाका (मोशी-देहू रस्ता)
३) हनुमानवाडी-इंद्रायणी हॉस्पिटल (चाकण- आळंदी रस्ता)
४) धानोरे फाटा (मरकळ- आळंदी रस्ता)
५) चऱ्होली बुद्रुक-विश्रांतवाडी (वडगाव घेनंद- आळंदी रस्ता)

१) मॅगझीन चौक येथे नाकाबंदी करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पुण्याहून येणारी वाहने दिघी मॅगझीन चौक-भोसरी-मोशी-चाकण मार्गाचा वापर करावा.
२) मोशी-देहू फाटा रस्ता बंद असणार आहे. डुडुळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार असून, मोशी ते चाकण ते शिक्रापूर हा मार्ग तसेच मोशी भोसरी ते मॅगझीन चौक, दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
३) चाकणकडून (आळंदी फाटा) येणारी वाहने आळंदी रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पीटलजवळील आळंदी फाटा हनुमानवाडी येथे नाकाबंदी करण्यात येणार आहे.
४) मरकळ रस्त्यावरील वाहनांनी बाह्यवळण मार्गाचा वापर करावा. धानोरे फाटा येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द बाह्यवळण मार्गाने चऱ्होली बुद्रुक मार्गे वाहने पुणे येथे जातील. मरकळ औद्योगिक वाहतूक कोयाळी वडगाव घेनंद शेलगाव फाटा चाकण या मार्गाचा वापर करावा.
५) अवजड वाहनांना यात्राकाळात या मार्गावर बंदी आहे.

लोणीकंद-मरकळ रस्ता बंद
दुरुस्तीच्या कारणास्तव जड वाहतुकीसाठी मुख्य पूल बंद करण्यात आल्याने आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यांची वाहने या रस्त्याने येणे शक्य नाही. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.