कोंडीच्या त्रासाने आळंदीकर हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडीच्या त्रासाने आळंदीकर हैराण
कोंडीच्या त्रासाने आळंदीकर हैराण

कोंडीच्या त्रासाने आळंदीकर हैराण

sakal_logo
By

आळंदी, ता. २५ : आळंदीत मंगल कार्यालयांकडे पार्किंगची व्यवस्था नाही. परिणामी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या चारचाकी वाहनांमुळे आळंदीकरांना वाहतूककोंडीचा सामना गेली काही वर्षे सातत्याने करावा लागत आहे. भोसरी, मरकळ, चाकण, शिक्रापूर औद्योगिक भागातील अवजड आणि चारचाकी वाहनेही मोठ्या प्रमाणात आळंदीतून ये-जा करत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन आणि पोलिसांकडे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने प्रश्‍न ‘जैसे थे’च आहे.
आळंदीकरांना वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा रस्त्याचे रुंदीकरण केल्याचे भासविले. मात्र दोन्ही बाजूने पदपथ निर्माण केल्याने रस्ता पूर्वीइतकाच वापरण्यासाठी मिळत आहे. देहू फाट्यावरून चाकण, वडगावकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाची गरज निर्माण झाली आहे.
वडगाव घेनंद, गोपाळपुरा, दत्त मंदिर रस्त्यावरही हीच अवस्था आहे. याठिकाणी धर्मशाळा, खासगी इमारतीमध्ये वाहनतळ नसतानाही लग्न सोहळे दिवसभर होतात. लग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्यांची वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यावरच उभी असतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करतात. मात्र परिस्थिती काही सुधारत नाही. येथील कोंडीचा त्रास सर्वांनाच होतो.
त्यातच मरकळ, चाकण, भोसरी औद्योगिक भागात जाणारी वाहतूक आळंदीतूनच जाते. शिक्रापूरकडे जाणारी वाहनेही आता वडगाव घेनंदमार्गे आळंदीतून जातात. दुपारी रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांच्या गर्दीमुळे सतत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वारकरी, महिला, लहान मुले, वृद्धांना चालणे जिकरीचे झाले आहे. भराव रस्ता, महाद्वारात तर गाड्यांचा खच असतो. अधूनमधून कारवाई होते. मात्र सातत्य नसल्याने या कारवाईकडे दुर्लक्षच होते.

फुटपाथवर अतिक्रमण नाही. पालिका वारंवार कारवाई करते. मंदिराकडील मार्गावरील लोखंडी गेट कायमस्वरूपी बंद केले जातील.
अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका

गेली दोन महिने जड वाहतूक आळंदीतून बंद केली. मंगल कार्यालयांना पार्किंग बंधनकारक करण्याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार केला. पालिकेने या बाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे.
शहाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक

येथे वाहतुकीची समस्या...
इंद्रायणी नदीवर दोन नवे आणि दोन जुने पूल आहेत. मात्र यावर पायी चालण्यासाठी स्वतंत्र पदपथ नसल्याने वाहन चालविणे जिकरीचे होते. वडगाव रस्ता, चाकण रस्त्यावर औद्योगिक वाहनांची संख्या लक्षणीय. चाकण रस्ता, गोपाळपुरा, दत्त मंदिर रस्त्यावर बेकायदा वाहने उभी असतात. मंदिर परिसरात नो पार्किंग फलकाकडे दुर्लक्ष करत वाहने लावली जातात त्यामुळे कोंडी होते.