
चऱ्होलीतील खुनाचा आणखी गुंता
आळंदी, ता. २४ : ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतामध्ये काम करत असताना रोटरमध्ये अडकून स्वतःचाच अपघाती मृत्यू झाल्याचा बेबनाव रचून फरारी झालेल्या सुभाष ऊर्फ केरबा छबन थोरवे (वय ६०, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) याला आळंदी पोलिसांनी खुनाच्या प्रकरणी शेलपिंपळगावमधून पकडून नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे चऱ्होलीतील खून झालेली व्यक्ती थोरवे नसल्याची खात्री झाल्याने अन्य कोणी व्यक्ती आहे का? याचा शोध आळंदी पोलिस घेत आहेत.
संशयित आरोपी केरबा थोरवे याने चऱ्होली खुर्द येथील शेतात जाण्यासाठी शुक्रवारी (ता. १६) दुपारी साडेतीन वाजता घर सोडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही म्हणून शनिवारी शोध घेतला असता शेतामध्ये मृतदेह दिसला. मृतदेहाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. विनाशीर मृतदेह आरोपी थोरवे याचाच असावा, असे समजून तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर नातेवाइकांनी विधिवत अंत्यविधी केले. दशक्रियाविधीही पार पडला. आळंदी पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
मात्र, शीर नसल्याने पोलिसांचा तपास सुरु होता. अधिक तपास केला असता आरोपी थोरवे हा शेलपिंपळगाव येथे रात्री जिवंत आढळला आणि पोलिसांना धक्काच बसला. शुक्रवारी चऱ्होली खुर्दमध्ये शेतामध्ये रोटरचे काम करत असताना अपघात झाला. डोके आणि हात संपूर्णपणे रोटरमध्ये अडकून मृत्यू झाला, असा बनाव रचून थोरवे फरारी झाला. त्यामुळे मृतदेह कोणाचा आहे, याबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, थोरवे याच्याबरोबरचा धानोरे येथील मित्र रवी घेनंद हा बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी दिली. त्यामुळे आता खून झालेली व्यक्ती घेनंद आहे की अन्य, याचा तपास आळंदी पोलिस करत आहेत.