आळंदीत अवैध लॉजिंग व्यावसायिकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत अवैध लॉजिंग व्यावसायिकांवर कारवाई
आळंदीत अवैध लॉजिंग व्यावसायिकांवर कारवाई

आळंदीत अवैध लॉजिंग व्यावसायिकांवर कारवाई

sakal_logo
By

आळंदी, ता.१४ : आळंदी आणि दिघी (ता. खेड) परिसरात अवैध लॉजिंग व्यावसायिक तसेच खुलेआम देहविक्रय करणाऱ्यांवर आज (ता. १४) पोलिसांनी धडक कारवाई केली. ''देहविक्रय करणाऱ्यांचा आळंदी परिसरात उपद्रव'' या मथळ्याखाली सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध होताच पोलिसांनी कारवाईचा फास आवळला.

पुणे-आळंदी रस्त्यावर मॅक्झीन फाटा ते आळंदीतील हनुमानवाडी, देहूफाटा, धानोरे भागात अवैध लॉजिंगचा व्यवसाय बोकाळला आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून महिला नागरिकांना हातवारे करत भुलवतात. याबाबतचे वृत्त सकाळमध्ये २ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाले होते. यामुळे दिघी व आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांच्या कारवाया सुरू झाल्या. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध ठिकाणी सर्व हॉटेल, लॉज व रस्त्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी अनैतिक स्वरूपाच्या गोष्टींवर कारवाई केली. पोलिसांनी आजपर्यंत एकवीस कारवाया केल्या आहेत. चार दिवसांपूर्वी देहूफाट्यावर लॉज मालकांसह दोघांवर गुन्हा दाखल केला गेला. आळंदी, दिघी परिसरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्यावतीने दैनंदिन पोलिस पेट्रोलिंगही करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलिस निरिक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे, धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, पोलिस अंमलदार सनील शिरसाट, सुधा टोके, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांचा सहभाग आहे.

धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. संस्कृती रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आळंदी देहू तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. याठिकाणी असे प्रकार होतात ही खेदाची बाब आहे. पोलिस प्रशासनाच्या कारवाईचे अभिनंदन.
- अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, धर्मवीर आध्यात्मिक सेना (बाळासाहेबांची शिवसेना)