
आळंदीचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प
आळंदी, ता. ८ : आळंदी (ता. खेड) नगरपालिकेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा ६५ कोटी ५८ लाख रुपये अंदाजपत्रकीय तरतूद असलेला ४ लाख ५७ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या वर्षी लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय स्तरावरच निर्णय घेण्यात आला. करवाढ नसलेला अर्थसंकल्प असला, तरी भामा आसखेड धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे विद्युत बिल, पालिकेचे पाणीपुरवठा केंद्राचे विद्युत बिल आणि पाण्याच्या रॉयल्टीसाठी जादाची दोन कोटी साठ लाख रुपयांची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याची विशेष बाब आहे.
मुख्याधिकारी कैलास केंद्रे, लेखापाल विभागातील देवश्री कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्थसंकल्प तयार केला. या अंदाजपत्रकास प्रशासक तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी मंजुरी दिली असून, अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. अन्य कोणतीही करवाढ नसल्याचा दावा पालिकेच्यावतीने प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तर पालिकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून येणारा दहा लाख रुपयांचा पहिला टप्पा अपेक्षित जमा रकमेत तरतूद केली.
पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या वीजबिलाची रक्कम अदा करण्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पाणीपुरवठा विभागातील भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्याच्या रॉयल्टीसाठी १ कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र तरतूद आहे. तर, थेट भामा आसखेड धरणातून शुद्ध पाणी येत असल्याने मागील वर्षी शुद्धीकरणास खर्च झाला नाही. हा खर्च कमी झाल्याने दोन कोटींची तरतूद पाणीपुरवठा विभागातील मागील बिलाची देयक देण्यासाठी ठेवली. विद्युत विभागासाठी चाळीस लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे.
तसेच, शहरातील विकासाची मोठी कामे शासनाच्या नगरोत्थान योजना जिल्हास्तरावर सात कोटी, नागरी दलितेतर सुधारणा योजनेतून ९० लाख रुपये, रस्ता अनुदान ३७ लाख रुपये, विशेष अनुदान एक कोटी, दलितवस्ती सुधार योजना ३ कोटी रुपये, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून भूसंपादन व इतर कामासाठी पाच कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी दहा कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामे योजना अनुदान दीड कोटी या शासनाच्या निधीवर अवलंबून आहेत.
अर्थसंकल्प दृष्टीक्षेपात
- अंदाजपत्रकीय तरतूद- ६५ कोटी ५८ लाख रुपये
- आरंभीची रक्कम- ११ कोटी २४ लाख ९१ हजार ६१२ रुपये
- महसूली जमा- १५ कोटी ३५ लाख ६५ हजार रुपये
- भांडवली जमा- ३८ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये
- एकूण अपेक्षित जमा रक्कम- ५४ कोटी ३४ लाख ५ हजार रुपये
- महसुली खर्च- २४ कोटी ५३ लाख ३४ हजार रुपये
- भांडवली खर्च- ४० कोटी १ लाख १३ हजार ९०० रुपये
- एकूण तरतूद- ६५ कोटी ५४ लाख ३८ हजार रुपये
- शिल्लक- ४ लाख ५७ हजार रुपये
अपेक्षित उत्पन्न
- संकलित कर- ४ कोटी ५० लाख रुपये
- पाणीपट्टी- ४५ लाख रुपये
- बांधकामावरील विकास शुल्क- १ कोटी १० लाख रुपये
- पालिका सहायक अनुदान- २ कोटी ६४ लाख रुपये,
- यात्रा अनुदान- १ कोटी ७० लाख रुपये
- इमारत भुईभाडे- ६० लाख रुपये
- यात्रेत पालिकेच्या जागांच्या लिलाव बाजारातून वसुली- १६ लाख रुपये
- वाहनतळातून- ६५ लाख रुपये
- सर्वसाधारण विशेष स्वच्छता कर- १८ लाख रुपये
खर्चाची तरतूद
- आस्थापना- ५ कोटी ६८ लाख रुपये
- प्रशासकीय- ३ कोटी २९ लाख रुपये
- बांधकाम- १ कोटी ५० लाख रुपये
- हंगामी कर्मचारी- १ कोटी ५० लाख रुपये
- घन कचरा व्यवस्थापन व आरोग्य विभाग- १ कोटी रुपये
- ठेका पद्धतीने कचरा उचलणे- १ कोटी ५० लाख रुपये
- महिला व बालकल्याण- ६ लाख ५० हजार रुपये
- दिव्यांग कल्याणनिधी- ६ लाख ५० हजार रुपये
- ज्येष्ठ नागरिकांसाठी- ३ टक्के निधी