
आळंदी पंचक्रोशीतील शाळांत ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ उपक्रम
आळंदी, ता. १९ : आळंदी आणि पंचक्रोशीतील सुमारे पन्नास शाळा जून महिन्यांपासून ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ हा संस्कारक्षम आध्यात्मिक उपक्रम शाळांमध्ये सुरू करण्याच्या विचारात असून, यासाठीचे साहित्य आणि खर्चाचे पालकत्व आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी घेणार आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच संत विचाराच्या अध्यात्माची ओळख व गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या विशेष सहकार्याने संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना वर्षभरापूर्वी सुरू केलेला ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमाची सुरुवात झाली होती. हा उपक्रम अनेक शैक्षणिक संस्थांनमध्ये राबविण्यासाठी एक संयुक्त बैठक आज आळंदीत झाली. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, सचिव अजित वडगावकर, तुकाराम गुजर, शिवाजी खांडेकर, चौधरी साहेब, संपतराव देवकते, तुकाराम गुजर, विष्णू तापकीर, दीपक मुंगसे, सूर्यकांत मुंगसे, उमेश महाराज बागडे, श्रीधर घुंडरे, प्राजक्ता हरपळे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तसेच विविध शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी, चरित्र समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. बैठकीसाठी खेड, बहुळ, धानोरे, रासे, मरकळ, चिंबळी, बालेवाडीबरोबरच इंदापूर बारामती तालुक्यातील शाळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
दरम्यान वारकरी संप्रदायातील विचारवंतांचे मार्गदर्शन या उपक्रमासाठी घेतले जाईल. ग्रामीण भागाबरोबरच पुणे आणि पिंपरी महापालिका हद्दीतील शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि विश्वस्त अॅड विकास ढगे यांनी सांगितले.
आळंदी ः ओळख ज्ञानेश्वरीची अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई.