आळंदीतील थकबाकीदारांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील थकबाकीदारांवर कारवाई
आळंदीतील थकबाकीदारांवर कारवाई

आळंदीतील थकबाकीदारांवर कारवाई

sakal_logo
By

आळंदी, ता. २५ : थकीत मिळकत कर वसुलीसाठी आळंदी (ता. खेड) नगरपालिकेने कडक धोरण अवलंबित शहरातील ११७ थकीत मिळकतधारकांचे नळ कनेक्शन तोडले. त्यामुळे जानेवारीत अवघी २१ टक्के असलेली कर वसुली आता अवघ्या अडीच महिन्यात पावणे ५४ टक्क्यांपर्यंत गेली. तरिही एकूण मिळकतींच्या जवळपास ५० टक्के मिळकतधारकांकडून अद्याप थकीत वसुली करणे बाकी आहे. मार्चअखेर आणखी कडक कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे.

अशी सुरू आहे कारवाई
मागील दोन वर्षात कोरोनाचा कालावधी असल्याने पालिकेने जप्तीची कारवाई टाळत नियमात शिथिलता आणली होती. मात्र, तरीही यंदाच्या वर्षी नागरिक कर भरण्यास उत्सुक नसल्याचे चित्र होते. याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाला. नोटीस देऊन आणि कर वसुलीसाठी रिक्षाद्वारे जाहीर आवाहन करूनही प्रतिसाद नव्हता. अखेर दोन पथके सक्तीच्या वसुलीसाठी लावली. यामध्ये प्रत्येकी १२ कर्मचारी वेगवेगळ्या मार्गावर कर वसुली करत आहेत. थकबाकीदारांवर कारवाईसाठी नळजोड तोडणे, मालमत्ता सील करण्याची कारवाई पालिकेकडून सुरू आहे. नागरिकांच्या दारात गेल्यावरच कर वसुली अधिक होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने थेट नळ कनेक्शन तोडण्यावरच भर दिला.

कोरोना काळामुळे लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने पालिकेकडूनच कर वसुलीबाबत शिथिलता आणली होती. लोकांवर त्यावेळी कर भरण्यासाठी सक्ती नव्हती. मात्र, आता सर्वकाही सुरळीत असल्याने नागरिकांनी कर भरणे अपेक्षित होते. वसुलीची रक्कम वाढली. पालिकेवर आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे कडक कारवाईचे धोरण अवलंबिले. जानेवारीपासून कर वसुलीला वेग आला. पालिकेचे कर्मचारीही नागरिकांच्या दारात जाऊन करवसुली करत असल्याने मिळकतधारकांनाही कर भरल्याशिवाय पर्याय नाही. दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकीदारांवर मात्र जप्तीची कारवाई केली जाणार आहे. दोन ते तीन वर्षांपासून थकबाकीदार असलेले २ हजार ६८९ मिळकतधारक आहे. या वसुलीवरच भर दिला जाणार असून, मार्च अखेरपर्यंत सर्व थकबाकीदारांकडून वसुली केली जाणार आहे.
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी (ता. खेड) नगरपालिका

कराचे उद्दिष्ट व वसुली दृष्टीक्षेपात
वार्षिक मागणी- ५ कोटी ८८ लाख ३४ हजार ७६१ रुपये,
मार्च अखेरीपर्यंतची थकबाकी- ७ कोटी १९ लाख ३१ हजार ३८०
मालमत्ताकराचे उद्दिष्ट- १३ कोटी ७ लाख ५६ हजार
एकूण वसुली- ७ कोटी २ लाख ६२ हजार ९२५
थकीत रक्कम- ६ कोटी ४ लाख ९३ हजार २१६
एकूण मिळकतधारक- ६ हजार ७१८
थकबाकीदार- ३ हजार ५८४
जानेवारीतील वसुली- २१ टक्के
फेब्रुवारीतील वसुली- ३५ टक्के
एकूण वसुली- ५४.५ टक्के