
आळंदीत आज पाणीपुरवठा बंद
आळंदी, ता. २७ : येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील मुख्य गावठाणाच्या प्रभाग सहामध्ये उद्या (ता.२८) पाणीपुरवठा तांत्रिक कारणास्तव बंद राहणार आहे, असे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.
आधीच पाण्याचे असमान वाटप अशी स्थिती असताना दोन दिवस पाणी पुरवठाच बंद अशा अवस्थेतील आळंदीकरांच्या मागचे पाण्याचे शुक्लकाष्ठ सुरुच आहे. वस्तुतः तीर्थक्षेत्र आळंदीसाठी भामा आसखेड धरणातून पुण्यास देण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेमधील कुरुळी जॅकवेल येथून (रॉ वॉटर) पाणीपुरवठा केला जातो. भामा आसखेड येथील केंद्रातील विद्युत पुरवठा तांत्रिक कामासाठी गुरुवारी (ता. २७ )दिवसभरासाठी बंद ठेवला होता. यामुळे आळंदीतील नदीपलीकडील सात आठ आणि नऊ या तीन प्रभागात पाणी बंद होते तर गावठाणातील प्रभाग एक ते सहा या शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही. तांत्रिक बिघाड नीट झाल्यास सर्व प्रथम नदीपलीकडे शुक्रवारी (ता.२८) व गावठाणात शनिवारी (ता. २९) पाणी विभागवार सोडले जाईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.