
इंद्रायणीतील प्रदूषण रोखण्यासाठी साखळी उपोषण
आळंदी, ता.२ : इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच ते करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी आळंदीतील इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि सहकारी यांनी आळंदीत सोमवारपासून (ता. १) संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिरासमोर महाद्वारात साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यास आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकरी तसेच विविध पक्ष तसेच संघटनांनी पाठिंबा दिला.
शिंदे यांच्यासोबत डॉ.सुनील वाघमारे, शिरिष कारेकर, जनार्दन पितळे, अरुण बडगुजर, दिनेश कुऱ्हाडे, दादा कारंडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, पुरुषोत्तम हिंगणकर साखळी उपोषणास बसले आहेत. उपोषणाबाबत शिंदे यांनी सांगितले की, गेली काही वर्षे इंद्रायणी नदीपात्रात उगमापासून ते संगमापर्यंतच्या नव्वदहून अधिक किलोमीटरच्या अंतरावरील गाव, शहरांकडून मैलायुक्त सांडपाणी सोडले जाते. काही रासायनिक प्रदूषणही कारखान्यांकडून केले जाते. याबाबत संस्थेच्या माध्यमातून तीन ते चार वर्षांपासून जलप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती केली. जलप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून ठोस ग्वाही मिळेपर्यंत उपोषण सुरुच राहील.
यासाठी मंत्रालयस्तरावर, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिका, तसेच स्थानिक पोलिस प्रशासनास पत्रव्यवहार केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उत्तम गोगावले, अविनाश तापकीर, आनंद मुंगसे, अनिता झुजम, चारुदत्त रंधवे, आशिष गोगावले यांनी पाठिंबा दिला. माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, डी. डी. भोसले, दिनेश घुले, बापू कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, अशोक रंधवे, संदीप नाईकरे, सुरेश दौंडकर, रमेश चौधरी, स्वकाम सेवा मंडळ, विश्व सामाजिक सेना यांच्यासह विविध ठिकाणहून आलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी प्रदूषणाबाबतच्या उपोषणास पाठिंबा दिला.
03367