माउलींचा रथ वारीसाठी सज्ज

माउलींचा रथ वारीसाठी सज्ज

आळंदी, ता. २ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी माउलींच्या चांदीच्या रथाची दुरुस्ती आणि डागडुजी पूर्ण झाली असून, आज शुक्रवारी (ता. २) चांदीच्या रथाला मानाची बैलजोडी जुंपून रथाची चाचणी करण्यात आली. माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी रथ आणि बैलजोडी आता आषाढी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर जवळपास अडीचशे किलोमीटरचा टप्पा चालण्यासाठी सज्ज झाले आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान रविवारी (ता. ११) आळंदीतून होत आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १२) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होईल. माउलींची पालखी चांदीच्या रथात ठेवून सोहळा पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
संपूर्ण वारीकाळात अडचण येऊ नये, यासाठी अगोदरच गेल्या काही दिवसांपासून आळंदी देवस्थानने सोहळ्यासाठीच्या चांदीच्या रथाची डागडुजी केली. रथावरील विजेची व्यवस्था करण्यासाठी बॅटरीची व्यवस्था केली. रथामध्ये आणि रथाभोवती गैरप्रकार झालेच, तर सर्व काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केले जाणार आहे. त्यासाठी रथामध्ये कॅमेरे लावले आहेत. रथाच्याभोवती जादाचे दोन फिरते कॅमेरा मागे आणि पुढे लावले जातील. रथाच्या लाकडी भागाचे रंगकाम केले आहे. रथाचे ब्रेक, ऑइलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. रथ सज्ज झाल्याने बैलजोडीचा मान असलेल्या आळंदीतील तुळशीराम भोसले आणि कुटुंबीयांनी रथाला बैलजोडी जुंपून रथाची चाचणी आज सकाळीच केली. आळंदी ते विश्रांतवड आणि विश्रांतवड ते आळंदी भक्तनिवासपर्यंत रथाला बैल जुंपून सराव केला. बैलजोडी मालकांनी आणि देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी रथाबाबत खात्री दिली असल्यामुळे रथ आणि बैलजोडी वारीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.
याबाबत आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर म्हणाले, ‘‘पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे आणि प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी वेळोवेळी माहिती घेत तयारीचा आढावा घेतला. वारी सुखकर होण्यासाठी रथाची चाचणी आवश्यक आहे. बैलाचाही सराव होतो. आता केवळ रथाला लावलेल्या चांदीला झळाळी आणण्यासाठी पॉलिश करण्यात येणार आहे. आधी हे काम केले तर हवेमुळे चांदी पुन्हा काळी पडते. यामुळे प्रस्थानापूर्वी दोन दिवस आधी चांदी पॉलिश केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com