समाजाला जोडण्याचे कार्य वारकरी संप्रदायाकडून

समाजाला जोडण्याचे कार्य वारकरी संप्रदायाकडून

Published on

आळंदी, ता. २० : ‘‘विखुरलेल्या समाजाला चालना देण्यासाठी संतांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या समाजाला जोडण्याचे कार्य केवळ वारकरी संप्रदायानेच केले आहे. हा संप्रदाय म्हणजे समन्वयाचे स्रोत आहे. संतत्त्व म्हणजे मातृत्व असून हेच समाजाला जोडून ठेवतात.’’ असा सूर आळंदीतील वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेत सहभागी सर्व कीर्तनकार आणि संत साहित्याच्या अभ्यासकांनी काढला.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ आणि ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या वतीने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्‍वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित दोन दिवसीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे तिसरे सत्र ‘वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल’ या विषयावर झाले. त्या सत्रात हा सूर निघाला.
या प्रसंगी पंढरपूर येथील श्रीगुरू अप्पासाहेब वासकर महाराज फडचे प्रमुख देवव्रत महाराज वासकर, आळंदी येथील डॉ. नारायण महाराज जाधव, श्रीवरद विनायक संस्थानचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक, पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे डॉ. दिनेश रसाळ, सामाजिक उद्योजक, आरएफआयडी-एनएफसी तंत्रज्ञानाचे प्रणेते असीम पाटील, संत साहित्याचे अभ्यासक, अर्थव्यवहार विश्‍लेषक अभय टिळक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड होते. यावेळी संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पोपटराव पवार, परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील उपस्थित होते.
दिनेश रसाळ म्हणाले, ‘‘जगाचे कल्याण हे केवळ संतांच्या विचारातच आहे. त्यामुळे साधू संतांच्या समतेचा विचार समाजात रुजवावा. त्यांनी माणुसकीचा संदेश दिला आहे. वसुधैव कुटुम्बकमची भावना ठेवणारे संत यांच्या आचरणामुळेच समाजाची घडी व्यवस्थित बसली आहे. समाजाला सुखी ठेवण्यासाठी सर्वांनी द्वेष वृत्ती संपवावी.’’
उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, ‘‘आधुनिक काळात वारकरी संप्रदायाला संकुचित होऊन चालणार नाही. विश्‍व कल्याणाचा विचार करता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संतांचे, कीर्तनकारांचे विचार सर्वदूर पसरवावे. वारकरी समाजाने समाजाला जोडण्याचे काम करीत आहेत. विखुरलेल्या या समाजाला एकत्रित जोडण्याचे कार्य आणि बळ केवळ वारकरी संप्रदायातच आहे.’’
असीम पाटील म्हणाले, ‘‘समाज प्रबोधनाचे कार्य वारकरी संप्रदाय करीत आहेत. वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला त्याच्या मनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळतात. शुद्ध, शाकाहारी भोजनामुळे व्यक्तीच्या विचारसरणीत खूप मोठा बदल घडतो.’’
डॉ. राहुल कराड म्हणाले, ‘‘समाज आणि गावाच्या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजाविण्यासाठी महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असलेले मौलिक लोककल्याणाचे कार्य, आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच लोक जीवनातील विविध दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाधिक कसे उपयोगी होईल. या विषयावर विविध अंगाने विचारमंथन होत आहे.’’
आळंदी येथील डॉ. नारायण महाराज जाधव, अभय टिळक, योगेश पाटील यांनी वारकरी संप्रदायामुळे लोकांचे कसे कल्याण होते हे सांगितले. तसेच ज्ञानोबांनी घालून दिलेल्या पायामुळे हा समाज आज ही टिकलेला असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शालिनी टोणपे यांनी तर आभार योगेश पाटील यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com