
कुडाची कांदा बराख उभारण्याकडे कल
आळेफाटा, ता.१९ : रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे लोखंड व स्टील यांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. यामुळे आधीच कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने लोखंडी कांदा चाळ उभारू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून आळे लवणवाडी (ता. जुन्नर) येथील कांदा उत्पादक धोंडिभाऊ विष्णू कुऱ्हाडे यांनी कांदा साठवणुकीसाठी जुन्या पद्धतीच्या कुडाच्या तीन आरणीत कांदा साठवणूक केली.
आरणी तयार करण्यासाठी बाजरीचे सरमाड, पाचट, बांबू, प्लास्टिक ताडपत्री यांचा वापर करण्यात आलेला आहे. साधारणपणे ८५ फूट लांब व ४ फूट रुंद याप्रमाणे एका आरणीत साधारणपणे ४५० पिशवी कांदा बसतो व या आरणीत कांदा सडण्याचे प्रमाण फारच कमी असते. विशेष म्हणजे एवढ्या मापाची लोखंडी आरण बनवायला ३ लाख रुपये खर्च येतो. मात्र, कुऱ्हाडे यांनी १५ हजार रुपयांमध्ये कुडाच्या तीन आरणीत बनविल्या आहेत. या कांदा आरणी उभारण्यासाठी आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा आडतदार विजय तानाजी कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले.
सध्या कांद्याला अतिशय कमी भाव मिळत आहे. यामुळे अनेक शेतकरी बराखीत कांदा साठवून ठेवत असतात. परंतु सर्वच शेतकऱ्यांकडे बराखी उपलब्ध नसते व नवीन बराखी तयार करण्यासाठी खूप खर्च येतो. कुडाची बराख फायदेशीर ठरणार असून यामध्ये कांदा सडणार नसून तो व्यवस्थित राहणार आहे.
- रखमा सखाराम कुऱ्हाडे, प्रगतशील शेतकरी
01380
Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00808 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..